पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८३)

असेल याची कल्पनाच करणे शक्य नाही. कोणचेही मत सांगावे आणि गीतेतला आधार द्यावा, कोणचाही आचार करावा आणि मनूचा आधार दाखवावा. असला मिथ्याचार या पद्धतीमुळेच सुरू होतो. गेली हजार वर्षे हिंदुस्थानात हेच चालले आहे. पण यामुळे मानसिक गुलामगिरीच्या शृंखला तुटणे लांबच राहून त्या दृढतर मात्र झाल्या. व व्यक्तीच्या मनाला स्वातंत्र्य मिळून त्याचा जो विकास व्हावयाचा तो मुळीच झाला नाही. जुने शास्त्र मला मान्य नाही, माझ्या काळचे शास्त्र मी ठरवीन असे निर्भयपणे सांगणारा महाराष्ट्रातला पहिला महापुरुष म्हणजे आगरकरच होय. तोपर्यंत आचरावे एक, बडबडावे दुसरे, मुळात असावे तिसरेच, अशी स्थिती होती. आणि ही तिन्ही परस्परविरुद्ध मुळीच नाहीत, असा समज उराशी धरून बहुजनसमाज शांतपणे चालला होता.
 प्रयोगनिष्ठेला तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य. मला नवीन संशोधन करण्याचा व माझी मते समाजात पसरविण्याचा जितका अधिकार आहे तितकाच तो दुसऱ्याला आहे हे प्रत्येकाला मान्य असले पाहिजे. रसायन, वैद्यक, आनुवंश इत्यादी शास्त्रातीलच फक्त प्रयोग येथे अभिप्रेत नसून धर्म, राजकारण, समाजकारण, याही क्षेत्रांतले प्रयोग विचारात घेतले आहेत, हे लक्षात घेतले म्हणजे तेथे व्यक्तिस्वातंत्र्य किती जरूर आहे हे ध्यानात येईल.
 व्यक्तिस्वातंत्र्य हा युरोपच्या अर्वाचीन वैभवाचा केवळ आत्माच होय. व्यक्तीच्या सुखाच्या दृष्टीने याचे किती महत्त्व आहे हे मागे संस्कृती व प्रगती या प्रकरणात सांगितलेच आहे. समाजाच्या दृष्टीनेही व्यक्तिस्वातंत्र्य अत्यंत अवश्य आहे. धर्मकारण, राजकारण, समाजकारण यात एकाच्याच नेतृत्वाने चालावे अशी जुनी पद्धत होती. पण तो एक कोण हे ठरविण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या अगदी अयशस्वी व विघातक आहेत असे अनुभवास आले आहे. बापासारखा तंतोतंत पुत्र निर्माण व्हावा अशी निसर्ग योजना असली तर कोणाचे नेतृत्व पत्करावे हे ठरविणे फारसे अवघड गेले नसते. एकदा एक मनुष्य निवडला की काम झाले. याच कल्पनेने वंशपरंपरा राजपद किंवा गुरुपद मागे दिले जात असे. पण बापासारखा मुलगा होत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपले सामर्थ्य, गुण, कर्तृत्व ही प्रगट करण्यास अवसर