पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८४)

देऊन त्यांतून जो सर्व समाजाला योग्य दिसेल तो निवडावा ही पद्धत प्रचारात आली. ही सर्वथा निर्दोष आहे असे मुळीच नाही. पण युरोपचा अर्वाचीन इतिहास पाहिला तर ही पद्धत जुन्या पद्धतीपेक्षा किती तरी पटीने जास्त कार्यक्षम आहे असे दिसून येईल. केवळ राजकारणी व मुत्सद्दीच याने वर येतात असे नसून प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्तिस्वातंत्र्याच्या पद्धतीने मोठमोठे पुरुष निर्माण होतात. इसवीसनापूर्वीचा हिंदुस्थानचा इतिहास पाहिला तर तेथेही हाच प्रकार आढळून येतो. समाजातल्या कोणच्याही थरातल्या कोणच्याही पुरुषाला वाटेल त्या क्षेत्रांतला वाटेल तितका उच्च विचार सुचू शकतो किंवा कोणचीही व्यक्ती कोणचाही पराक्रम करू शकते. आणि असा स्फुरलेला विचार त्या पुरुषाला सांगू दिला नाही, किंवा व्यक्तीच्या पराक्रमाला अवसर मिळाला नाही तर, जग अनेक महापुरुषांना मुकते. म्हणून व्यक्तिस्वातंत्र्य हे समाजव्यवस्थेचे मूलतत्त्व असावयास पाहिजे.
 प्रयोगनिष्ठेला अवश्य म्हणून जे गुण येथपर्यंत सांगितले त्यांच्या व विशेषतः व्यक्ति- स्वातंत्र्याच्या वाढीला लोकशाही ही फार पोषक असते. लोकशाहीत सर्व समाज खालपासून वरपर्यंत डहुळला जातो. समाजाच्या उत्कर्षापकर्षाची जाणीव तरी निदान लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला जितकी चांगली असते तितकी राजशाहीत नसते. म्हणून व्यक्तिस्वातंत्र्य व लोकशाही यांचे संबंध अविभाज्य आहेत असे म्हणावे लागते. म्हणूनच पूर्वेच्या पश्चिमीकरणात राजशाही जाऊन लोकशाही येणे याला फार महत्त्व आहे. पण गेल्या दहापांच वर्षांत युरोपात मुसोलिनी, हिटलर, स्टॅलिन वगैरे पुरुषांनी हुकूमशाही चालवून व्यक्तिस्वातंत्र्य, आणि त्या स्वातंत्र्याची जननी जी लोकशाही तिचा अगदी नायनाट करून टाकला आहे, आणि त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा व लोकशाहीचा प्रयोग युरोपात फसला आहे असे वाटून पूर्वेकडची पूर्ण निर्बंधाची व राजशाहीची तत्त्वेच समाजधारणेस हितकर आहेत असे लोकांचे मत होऊ लागले आहे. तेव्हा त्याचा थोडासा विचार केला पाहिजे.
 'मॉडर्न सिव्हिलिझेशन ऑन ट्रायल' या ग्रंथांत बर्नस् ने या प्रश्नाची चांगली चर्चा केली आहे. तो म्हणतो की ज्या देशांत सध्या हुकूमशाही स्थापन झाली आहे, त्या देशात पूर्ण लोकशाही अशी कधी स्थापनच झालेली नव्हती. जर्मनी, रशिया, इटली या देशात राजेच राज्य करीत होते. म्हणून