पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८५)

लोकशाही पूर्णतेला गेली आणि तो प्रयोग फसला असे या देशाची उदाहरणे दाखवून म्हणताच येणार नाही. या बाबतीत मला आणखी असे सुचवावेसे वाटते की या वरील देशांतही लोकशाहीच्या अनेक तत्त्वापैकी व्यक्तिस्वातंत्र्य हे प्राणतत्त्व जरी मुरगळले जात असले तरी सरकार हे लोकांच्यासाठी असले पाहिजे, राज्य ही राजाची दौलत नाही, हे जे लोकशाहीचे दुसरे मुख्य तत्त्व ते अजूनपर्यंत तरी पाळले जात आहे.
 दुसरे असे की हुकूमशाही जेथे चालली आहे अशा देशांपैकी प्रमुख जो रशिया त्याने आता नुकतीच लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. जुन्या रानटी अवस्थेतून लोकांना नवीन वातावरणात आणण्यापुरतीच तेथली लोकशाही होती हे यावरून स्पष्ट आहे. तुर्कस्थानात केमालपाशाचे हेच धोरण आहे. तेथली लोकशाही अगदी थेट रशियासारखी होणार नाही हे खरे; पण इंग्लंड- फ्रान्ससारखी खास होईल. इटाली व जर्मनीमध्ये पडत्या भांडवलशाहीला सावरण्याच्या प्रयत्नांतून दोन हुकूमशहा निर्माण झाले आहेत पण तेथेही बाह्यणत: तरी देशांतील बहुसंख्य लोकांच्या मतानेच हे हुकूमशहा निवडून आलेले आहेत. तेव्हा लोकशाहीचा प्रयोग फसला असे तर नाहीच म्हणता येत, पण उलट अगदी पूर्ण राजशाही असलेले देशही हुकूमशाही या पायरीवरून संपूर्ण लोकशाहीकडेच येत आहेत असे म्हणावे लागते.
 इंग्लंड व अमेरिका या देशांत लोकशाही वगैरे काही नसून काही भांडवलवाल्यांचे हाती सर्व सत्ता आहे असे विधान अलीकडे पुष्कळ ऐकू येते. हे विधान जरी काही अशी खरे असले तरी त्यावरून जे अनुमान काढण्यात येते ते मात्र सर्वस्वी चूक आहे. समता, व्यक्तिस्वातंत्र्य यांचे हे परिणाम आहेत अशी सध्या हाकाटी चालू आहे; पण थोडा विचार केला तर समता व व्यक्तिस्वातंत्र्य यांचे हे परिणाम नसून समता व व्यक्तिस्वातंत्र्य हे काही कारणाने कमी झाल्यामुळेच ही आपत्ती ओढवली आहे असे दिसून येईल. 'प्रोग्रेस अँड् प्रॉव्हर्टी' या आपल्या पुस्तकात हेन्री जॉर्ज याने या प्रश्नाचे विवेचन केले आहे. हिंदी, मिसरी, चिनी, बाबिलोनी या संस्कृती उदयास आल्या व नाहीशा झाल्या; तशीच सध्याची युरोपची संस्कृती एक दिवशी नाहीशी होईल की काय, या प्रश्नाचा युरोपमधील बरेच पंडित सध्या विचार करीत आहेत. हेन्री जॉर्ज हा त्यांपैकीच एक आहे. त्याच्या मते संघटना,