पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८६)

समता व स्वातंत्र्य ही प्रगतीची मूलतत्त्वे होत हे सांगून त्याने पुढीलप्रमाणे विवेचन केले आहे. जेव्हा संकृती उदयास येते तेव्हा या तत्त्वानुसार समाजरचना झालेली असते पण पुढे समाजाचा उत्कर्ष होऊ लागला की विशिष्ट कार्य विशिष्ट लोकांकडे जाऊन त्यांचा एक वर्ग तयार होतो. आणि मग समाजाचे लवचिक स्वरूप जाऊन तेथल्या व्यवस्थेला कडकपणा येतो. आपल्या हातातले ठावके जाऊ नये म्हणून कोणच्याही सुधारणेला समाजांतले हे स्थिर झालेले वर्ग विरोध करू लागतात. व हा विरोध यशस्वी व्हावा म्हणून त्यांना दुसऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घ्यावे लागते. येथूनच संस्कृतीच्या अधःपातास प्रारंभ होतो. म्हणजे समता व स्वातंत्र्य यांनी समाजाचा नाश होत नसून त्यांची गळचेपी झाल्याबरोबर नाश सुरू होतो.
 हिंदुस्थानांत कडक वर्गवारी प्रथम मनूने सुरू केली आणि तेथूनच हिंदुस्थानच्या अधःपातास सुरुवात झाली असे मला वाटते. पण मनूने घातलेले निर्बंध हे अगदी कडक नव्हते. इसवी सनाच्या सातच्या आठव्या शतकांत मनूने सुरू केलेले कार्य पूर्ण झाले आणि तेथून मग प्रगती आणि स्वातंत्र्य यांना हा देश बव्हंशी मुकलेलाच आहे. इ. स. १००० पासून गझनीच्या महंमदाच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. त्यांचा प्रतिकार कोणीच करू शकला नाही ! महंमदाचा एकदाही पराभव झाला नाही ! पुढे साम्राज्याच्या रूपानेच मुसलमानी आक्रमण सुरू झाले. त्याला प्रतिकार करून ते जवळ- जवळ नाहीसे करण्यात यश आले ते फक्त मराठ्यांनाच. आणि ते का तर मनूचे वर्गबंध त्यांनी सर्वस्वी झुगारून दिले म्हणून. म्हणजे समतेच्या व व्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्त्वानेच येथे उत्कर्ष झाला असे दिसते. एरवी मुसलमानी लाटेखाली सर्व देश बुडून गेला असता.
 प्रयोगनिष्ठा, समता, व्यक्तिस्वातंत्र्य व लोकसत्ता या अर्वाचीन पश्चिमेच्या चार ठळक लक्षणांचा येथवर विचार झाला. पश्चिमेच्या जीवनात खोल रुजलेली म्हणून जी तत्त्वे मागे उल्लेखिली होती ती हीच. या तत्त्वामुळे सर्व समाज अंतर्बाह्य बदलून जाऊन त्याचे जे दृश्य परिणाम आज सर्व जगाला दिसत आहेत त्यांचा विचार आता करावयाचा आहे.
 पश्चिमेकडे अगदी सहज नजर फेकली तरी यंत्र हा तिचा सर्वात तेजस्वी अलंकार आहे हे कोणासही दिसून येईल. वाहतुकीची, डोंगरफोड-