पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८७)

ण्याची, समुद्र किंवा आकाश तरण्याची मोठमोठी कामेच यंत्रे करतात असे नसून झाडणे, सारवणे, धुणे, पुसणे हीही कामे आता पश्चिमेकडे यंत्रे करू लागली आहेत. हाताने किंवा काठीने जमीन उकरणाऱ्या मानवाला नांगराचा जेव्हा शोध लागला तेव्हा त्याच्या स्थितीत जो फरक पडला तोच वास्तविक त्या पुढच्या प्रत्येक शोधाने पडत गेलेला आहे. तो पहिला शोध जितका निषिद्ध किंवा ग्राह्य तितकाच शेवटचा असावयास पाहिजे. पहिल्याने मानवाला पशुकोटीतून उचलून मनुष्यतेप्रत आणण्यास जर मदत केली असेल तर शेवटचाही खास करील आणि तो करीत नसला तर त्याच्या वापरात काही तरी चूक होत असली पाहिजे हे उघड आहे. पण हे ध्यानात न घेता काही लोक यंत्राला सैतानी, राक्षसी इत्यादी शिव्या देताना आढळतात व ते पाहून आपणाला मोठा विस्मय वाटतो.
 अलीकडील यंत्राने हजारो मानवांच्या तोंडचा घास काढून घेतला असा यंत्रावर पहिला आरोप आहे. पूर्वी जे काम दहा लोक करीत असत तेच आता यंत्रांच्या साह्याने एकटा मनुष्य करतो आणि त्यामुळे नऊ माणसे उपाशी मरतात असा हा मुद्दा आहे. या मुद्यात अनेक प्रकारच्या चुका आहेत. दहा माणसांपैकी एकाने काम करून नवांना उपाशी ठेवावे असे काही यंत्राने सांगितलेले नाही. काम सोपे व कमी झाल्यास प्रत्येकाने एक दशांश काम करून जास्त सुखी होणे हेही शक्य आहे. आणि या दृष्टीने पाहिल्यास यत्राने घास तर काढून नाहीच घेतला पण एकदशांश श्रमात तितकाच घास मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे असे दिसून येईल. आणि असे असूनही मानवाला हे सुख मिळत नसेल तर तो दोष यंत्रांचा नसून यंत्र वापरणाऱ्या समाजाचा आहे असे म्हणणे प्राप्त आहे.
 अलीकडच्या यंत्रांची संहारशक्ती फार प्रचंड आहे व त्यामुळे शेवटी मानवी संस्कृतीचा व मानवाचाही पृथ्वीच्या पाठीवरून नायनाट होऊन जाईल असे काही पंडितांचे मत आहे. ही भीती अगदीच निरर्थक आहे असे म्हणता येणार नाही. पण याचाही बारकाईने विचार केला तर हा दोष यंत्राकडे नसून मानवाच्या मनाच्या दुसऱ्या काही स्वाभाविक दुर्गुणाकडे आहे असे दिसून येईल.