पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८८)

 पूर्वीच्या व अलिकडच्या मानव समाजाकडे पाहिले तर असे दिसून येते की हल्ली मानवाचे मोठमोठाले गट राष्ट्र या नावाने रहात आहेत. एकाच इंग्लंडमध्ये पाचशे निरनिराळ्या टोळ्या असण्याऐवजी आता इंग्लंड व स्कॉटलंड मिळून एकच टोळी म्हणजे राष्ट्र आहे आणि मानवाची दुष्ट प्रवृत्ती किंवा मारामारीची हौस हल्ली कमी झाली आहे असे जरी म्हणता येत नसले तरी एवढे खास म्हणता येईल की इंग्लंडमधल्या पाचशे टोळ्यांमध्ये रोज ज्या मारामाऱ्या व रक्तपात पुरातन काळी होत असत त्या आता खास टळल्या असून मानव तितका सुखी झाला आहे. स्टोरी ऑफ सिव्हिलिझेशन- मध्ये विल डुरंट याने म्हटले आहे की समाजात माणसाला आपल्याला रोज अन्नवस्त्र नक्की मिळेल अशी खात्री असेल व कोणच्याही क्षणाला मरण येऊ शकेल, किंवा कोणी तरी जबरदस्त येऊन खंडणी उपटू शकेल हा धसका नाहीसा झाला असेल तरच संस्कृती जन्मास येऊन वाढू शकते. म्हणजे अन्न व स्वास्थ्य हे संस्कृतीचे मुख्य घटक होत आणि आज या दोहोंबद्दल सुधारलेल्या समाजात जी मागल्यापेक्षा जास्त खात्री निर्माण झाली आहे तिचे सर्व श्रेय राष्ट्र या कल्पनेला आहे. यापुढे थोडा विचार केला तर असे दिसून येईल की सध्याची राष्ट्र ही कल्पना केवळ यंत्रामुळेच शक्य झालेली आहे. टेम्स नदीच्या काठी राहणारे सरकार स्कॉटलंडमध्ये वचक बसवू शकते ते केवळ यंत्रे आहेत म्हणून. त्याला तेथे पोचावयासच दहा दिवस लागणार, आणि तेथला किल्ला घ्यायला आणखी दोन महिने लागणार अशी स्थिती असती तर सर्व राष्ट्र एका मध्यवर्ती सत्तेखाली ठेवणे महामुष्कील झाले असते. पण सध्याचे सरकार दोन तासात स्कॉटलंडमध्ये जाऊन एकाच तासात किल्ल्यात प्रवेश मिळवू शकते, म्हणून किल्लेदार हा बंड करूच शकत नाही. बंदुकीच्या दारूमुळे सरदारवर्ग नाहीसा होऊन सर्व इंग्लंडची सत्ता केन्द्रित झाली ही गोष्ट प्रसिद्धच आहे. यंत्रसामर्थ्य असूनही दुसऱ्या काही दोषांमुळे सत्तेचे केन्द्रीकरण करना येत नाही अशी स्थिती असणे शक्य आहे. पण यंत्र नसताना सतत लढाई न करता दीर्घकाल सत्तेचे केन्द्रीकरण करणे म्हणजे तो चमत्कारच होय. ती अशक्य कल्पना आहे. हे जर खरे असले तर इंग्लंडमधल्या पाचशे टोळ्या व फ्रान्समधल्या पाचशे टोळया यांच्यातला नित्याचा रक्तपात टाळून संबंध इंग्लंड व संबंध फ्रान्स यांच्यामध्येच तो होईल व तोही पाचपंचवीस वर्षांनी