पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८९)

एकाद वेळी होईल अशी जी स्थिति आज प्राप्त झाली आहे तिला यंत्रच कारण आहे असे म्हटले तर ते अमान्य होणार नाही असे वाटते. यंत्राने माणसांची आयुर्मर्यादा वाढविली आहे; पूर्वीच्यापेक्षा दसपट धान्य निर्माण करून जगाची लोकसंख्या तिप्पट किंवा चौपटही वाढली तरी पोसणे शक्य करून ठेवले आहे; चार वर्षांच्या महायुद्धात जेवढे लोक मेले त्याच्या दसपट लोक एक वर्षात प्लेग नेत असे. त्याला युरोपातून कायमचा हाकून लावणे यंत्रानेच शक्य केले आहे. या व अशाच प्रकारच्या आणखी गोष्टी ध्यानात घेतल्या व राष्ट्र कल्पना यंत्रानेच शक्य आहे, ही वर सांगितलेली गोष्ट त्यात भरीला घातली तर मानवाचा यंत्राने जो संहार केला आहे तो त्याने केलेल्या उपकारापुढे काहीच नव्हे हे ध्यानात येईल. सिव्हिलिझेशन ऑफ दि ईस्ट ॲण्ड वेस्ट या आपल्या निबंधात हू-शी या चिनी लेखकाने यंत्रनिदकांना चांगले उत्तर दिले आहे. त्याचे म्हणणे थोडक्यात असे आहे. रिक्षा ओढणाऱ्या माणसांना पशूंपेक्षा जास्त काही संस्कृति नसते. त्या रिक्षापासून त्या मानवांना सोडविण्याचे काम यंत्राने केले आहे. कोणच्याही धर्मोपदेशाला किंवा उच्च तात्त्विक सिद्धान्ताला हे शक्य झाले नव्हते. याचा अर्थ असा की, यंत्र हा कोणाच्याही मानवी संस्कृतीचा आधारस्तंभ आहे. पूर्वेत संस्कृती उभारली ती यंत्रसामर्थ्याने. मध्यंतरीच्या काळात तिने यंत्र सोडून देऊन अध्यात्मचिंतन केले त्यामुळे तिचा ऱ्हास झाला. त्याच वेळी पश्चिम ही यंत्रोपासना करीत होती. आणि त्या सामर्थ्याने तिने पूर्वेला गुलाम करून ठेवून तिच्या अध्यात्मिक व ऐहिक अशा दोही संस्कृतोचा नाश करून टाकला आहे.
 यंत्राचे सामर्थ्य व महत्त्व हे असे स्पष्ट असतानाही काही लोक त्याकडे मुद्दाम डोळेझाक करून त्याचा निषेध करतात. आणि चरख्यासारख्या साधनांचा जीर्णोद्धार करू पहातात. काही एका काळापुरता उपाय म्हणून जर चरखा आला असेल, तर त्याला थोडासा अर्थ आहे असे म्हणता येईल. तलवार, बंदूक हातात नाही म्हणून काठीचा उपयोग करणं जसे बरोबर ठरेल तसेच गिरण्या उभारता येत नाहीत म्हणून, किंवा शेतकऱ्यांना दुसरा काहीच उद्योग नाही म्हणून, चरखा सांगणे काही लोकांच्या मते बरोबर ठरेल. पण तसे काही नसून यंत्रांशी विरोध म्हणून जर चरखा येणार असेल तर, आणि प्रत्येक माणसाने आपले अन्नवस्त्र आपण करावे. अशी कल्पना असेल तर, ती कल्पना