पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९०)

बरोबर नाही. कारण श्रमविभाग करून माणसांना अन्नवस्त्राच्या रोजच्या जिकिरीतून सोडविणे हे तर सुधारणेचे पहिले लक्षण आहे.
 पण सध्या यंत्रालाच लोक शिव्या देतात असे नसून त्या यंत्राने निर्माण केलेल्या समृद्धीलाही शिव्या देतात असे दिसते. समृद्धीला शिव्या देणाऱ्या या लोकांचा मुद्दा अगदी निराळा आहे. यंत्राने अन्नाचा घास काढून घेतला, किंवा संहार केला हा त्यांचा मुद्दाच नाही. त्यांचा मुद्दा आध्यात्मिक आहे. भोग हे मानवाचे ध्येय नसून त्याग हे आहे; गरजा वाढविणे हे ध्येय नसून त्या कमी करीत आणणे हे आहे असे त्यांना वाटते. भोग ही जड तामसी संस्कृती असून त्याग ही उच्च सात्विक संस्कृती आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची मुख्य कल्पना अशी आहे की भोगाने भोगेच्छा वाढत जाते आणि तृप्ती अशी कधीच होत नाही, अग्नीत तूप घातल्याने तो जसा वाढतो तशा वासना या विषयांच्या उपभोगाने कमी न होता वाढतच जातात हे गीतावचन प्रसिद्धच आहे. पण या गीतेला असे विचारावेसे वाटते की भोगाने भोगेच्छा वाढत जाते, हे जरी क्षणभर खरे असले तरी त्यागाने ती कमी होते हे खरे आहे काय ? आज हजारो वर्षे शेतकरी व मजूर हे साहेब भोगीत असलेल्या सुखाचा त्यागच करीत आले आहेत. पण त्यांची भोगेच्छा कमी झालेली नसून नुसत्या तुकडयासाठी ते वाण्याबामणाच्या दाराशी लोळत असतात. यावर गीता म्हणेल की शेतकऱ्यांचा त्याग सक्तीचा आहे. त्याग मनाने करावयास हवा. पण मनाने केलेला त्याग हा जर श्रेष्ठ तर तेथे श्रीमंती- गरिबीचा प्रश्न येतोच कोठे ? मनःसंयम ज्याला करता येतो, तो श्रीमंतीत किंवा गरिबीत सारखाच वागेल. भोवतालच्या श्रीमंती- गरिबीवर मनःसंयम अवलंबून आहे हे खरे, पण तेथेही असे दिसेल की संतुष्ट झालेला म्हणजे श्रीमंत आत्माच जास्त संयम करू शकेल. गरजा मारून त्याग करता आलाच तर तो एखाद्यालाच येईल. बहुजन समाजाला गरजा मारण्याचे तत्त्व शिकविणे म्हणजे भिकाऱ्याला जिलबी खाऊ नकोस असा उपदेश करण्यासारखेच आहे. अनेक पक्वान्नांच्या राशी भरून ठेवाव्या, मनमुराद खाऊ द्यावे आणि मग त्या खाणाऱ्याला बजावावे की बाबा तुला संयम अवश्य आहे. नाश होईल इतका भोग घेऊ नकोस. यात खरा शहाणपणा आहे. आणि पाश्चात्यभोगवादी समाज नेमक हेच करीत आहे. भांडवलवाले हे स्वार्थी आहेत. त्यांचा पक्ष कोणीच