पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९१)

घेत नाही. पण पश्चिमेकडचे जे समाजवादी लोक आहेत, जे कामकऱ्याचे कैवारी आहेत त्यांचे हेच प्रतिपादन आहे. रशियांतल्या प्रत्येक व्यक्तीच्या गरजा जास्तीत जास्त वाढल्या पाहिजेत व त्या पुरविण्यासाठी तेथे जास्तीत, जास्त माल निर्माण झाला पाहिजे, असेच सध्याच्या तेथल्या धुरीणांचे मत आहे. 'भोगवादी' या नावाने हिंदूंच्या मनात संस्थानिक, इनामदार असा जो अजागळ वर्ग येतो तसला पंथ युरोपात मुळीच नाही. अगदी भांडवलवाले लोक घेतले तरी तेही असे नाहीत. काही कारखानदार तर मजूर करणार नाही इतके काम करीत असतात. मालाचा खप, बाजार यावर त्यांना सदैव लक्ष ठेवावे लागते. मजुरात व त्याच्यांत फरक इतकाच की काम संपले की ते तितक्याच वेगाने सुखोपभोगांत निमग्न होतात. आणि मजुराला ते मिळत नाही. यातील अन्यायाचा व अनीतीचा भाग काढून टाकून जो भोग शिल्लक राहील त्याची तपासणी केली तर असे दिसेल, की प्रत्येक समाजाने हेच ध्येय आपल्यापुढे ठेवले पाहिजे. गरजा वाढवून त्या पुरविणे यातच खरे मनुष्यत्व आहे. संयम हवा याबद्दल वादच नाही. पण संयमहीन भोग हा पश्चिमेकडे कोणीच कधी मान्य केलेला नाही. तसा तेथे चालू असलाच तर तो पूर्वेपेक्षा जास्त खास नाही. गरजा वाढवाव्या, भोगेच्छा वाढवाव्या व त्या पुऱ्या कराव्या हे गरजा मारण्यापेक्षा जास्त चांगले हे मात्र पश्चिमेने नवीन धोरण आखले आहे यात शंकाच नाही. पण ही उन्नती असून परागती मुळीच नाही. त्याग हे निराश वेदान्ताचे तत्त्व आहे. वर्धिष्णु, जयिष्णु राष्ट्राला किंवा व्यक्तीला ते सर्वथैव हानिकारक होय. आणि प्रत्येक राष्ट्राने वर्धिष्णु व्हावे असे आपले तत्त्वज्ञान असल्यामुळे त्याग ही कल्पना केव्हाच ग्राह्य नाही.
 असंतोषः श्रियो मूलम् । हे व्यासमहामुनीचे वचनच प्रत्येकाने ध्यानात धरणे अवश्य आहे. (येथे वापरलेल्या त्याग शब्दाचा स्वार्थत्यागाशी काही संबंध नाही. स्वार्थत्याग हा दुसऱ्यासाठी असतो. तो महासद्गुण आहे. त्याग म्हणजे स्वतःच्या गरजा उगीचच मारणे. तो महा दुर्गुण आहे) पाश्चात्यांच्या भोगवादाची टर करण्याची अलीकडे चाल पडू लागली आहे. त्यात, ते स्वार्थी असतात, विषयांध असतात, नीच असतात इत्यादी कल्पना उगीचच घुसडल्या जातात. त्या खोट्या आहेत. वेश्यामदिरा लांबच राहिल्या, पण सिगारेटही न ओढणारा हेन्री फोर्ड हा भोगवादी आहे. सर्व जगातील कामकऱ्यांच्या