पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९२)

हितासाठी झटणारे लेनिन, स्टॉलिन हे पुरुष भोगवादी आहेत. हे ध्यानात घेतले तर भोगवाद म्हणजे काय हे ध्यानात येऊन पश्चिमेप्रमाणे पूर्वेलाही भोगवादाकडेच वळले पाहिजे हे ध्यानात येईल. पूर्वेला यात फारसे कष्टप्रद वाटण्याचे काही कारण नाही. कारण उपनिषदापूर्वीच्या वेदकाळी ती तशीच होती असे काही पंडितांचे म्हणणे आहे.
 यंत्रामुळे समृद्धी वाढली व समृद्धीमुळे भोगवाद निर्माण झाला हे तर खरेच आहे. पण तो बळावण्यास आणखीही एक कारण झालेले आहे. ज्या प्रयोग निष्ठेतून यंत्र निर्माण झाले तीतूनच जडवाद निर्माण झाला या जीवितापलीकडे काही नाही आणि असले तरी त्यामुळे येथील आचारविचारावर परिणाम व्हावा इतके त्याचे ज्ञान मानवास मुळीच नाही, हा सुविचार विज्ञानाच्या अभ्यासामुळे व प्रसारामुळे देशात रुजत गेला आणि त्यामुळेच त्यागवाद जाऊन तेथे भोगवाद आलेला आहे. गरजा मारणे, वासना खंडणे यांनी परमार्थ साधावयाचा असतो. तो परमार्थच नाहीसा झाल्यामुळे त्यागवाद अर्थातच लंगडा पडला. या संबंधाचे आणखी विवेचन 'राइट टु बी हॅपी' या सी. डोरा रसेल यांच्या पुस्तकांत सापडेल. एकोणिसाव्या शतकांत प्रबल असलेला जडवाद आता लोपत चालला आहे असे अनेक शास्त्रज्ञ सांगत आहेत. ३१ जुलैच्या 'केसरीत' ईश्वराबद्दल सात शास्त्रज्ञांची मते दिली आहेत. ते सर्वजण जडवादाच्या विरुद्ध आहेत. आणि जगाला हेतू असून त्याच्यामागे ईश्वर आहे असे ते सांगतात. पण त्यांचे मूळ लिखाण पाहिले तर असे दिसेल की पदार्थविज्ञान व रसायन यांनी सृष्टीचे संपूर्ण पृथक्करण करता येत नाही एवढेच त्यांनी सिद्ध केले आहे. काही एका मर्यादेपर्यंत मानव जाऊ शकतो. त्यापलीकडच्या सृष्टीत व्यक्त होणाऱ्या शक्ती त्याला अद्याप जाणता आलेल्या नाहीत व कदाचित् कधीच जाणता येणार नाहीत. शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे ते एवढेच. पण यावरून त्यागवाद किंवा भोगवाद यावर किंवा मानवाच्या कोणच्याही आचारविचारावर परिणाम होण्याइतके अजून काही सिद्ध झाले आहे असे मुळीच नाही. जडसृष्टीपलीकडे चेतनसृष्टी आहे असे ते म्हणतात. असेलही ! पण त्यावरून जगाला हेतू आहे किंवा त्याच्यामागे ईश्वर आहे असे म्हणता येणार नाही. मोठेमोठे शास्त्रज्ञ तसे म्हणत असल्यास तशी त्यांची श्रद्धा आहे इतकेच फार तर सिद्ध होईल. प्रयोग करून त्यांनी तसे