पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/२००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९४)

केली आहे. आता येथे त्याच बाबतीतल्या आणखी काही प्रमाणांचा व अध्यात्मिक संस्कृतीशी संबंध असलेल्या इतर काही गोष्टींचा विचार करावयाचा आहे.
 अलिकडे युरोपमध्ये मृत्यूनंतरच्या जीवनाचा बराच अभ्यास सुरू झाला आहे. त्यासाठी अनेक संस्था स्थापन झाल्या आहेत. आणि सर ऑलिव्हर लॉज, कॉनन् डॉइल्, मायरस्; डॉ. व्हेरॉल यासारख्या थोर लोकांचा त्यावर पूर्णपणे विश्वास बसला असून इतरही अनेक पंडित त्या बाबतीत संशोधन करीत आहेत. मृतात्म्यांचे सदेश काही ठराविक व्यक्तींच्या मार्फत या जगात येऊ शकतात, कोणच्याही बाह्य साधनांवाचून व्यक्तीच्या मनातले विचार ओळखले जातात, इतकेच नव्हे तर मृत आत्म्यांचे आचारविचार समजणे शक्य झाले असून त्याचे फोटोही काढता येतात असे सध्या सांगितले जाते. या बाबतीत उलटसुलट अनेक ग्रंथ आहेत. आणि असे का व्हावे याच्या अनेक शास्त्रीय किंवा काल्पनिक उपपत्ती सांगितल्या जातात. जोसेफ मॅककेब् याने या सर्व कल्पनांची अगदीच टर केली आहे व या सर्वांच्या बुडाशी लुच्चेगिरीवाचून दुसरे काही नाही असे सांगितले आहे. पण इतका एकांतिक पक्ष टाकून देऊन सी. ई. एम्. जोड याने त्यांचा जरा सहानुभूतीने विचार केला आहे. व त्याने शेवटी असे म्हटले आहे की हे सर्व फसवेगिरीचे प्रकार आहेत असे जरी म्हणता येणार नाही तरी या क्षेत्रात येणाऱ्या सर्व अनुभवांचे स्पष्टीकरण करील अशी समाधानकारक एकही उपपत्ती अजून बसविता येत नाही. (गाइड टु मॉडर्न थॉट पृ. १७९) जोडचे हे म्हणणे सर्वांना मान्य येत नाही व मृत्यूनंतरचे जीवन, कोणच्याही स्वरूपात का होईना, आहे असे जरी त्यांनी मानले तरी एक गोष्ट अगदी निश्चित आहे की त्या जीवनाचे खरे स्वरूप, येथील पापपुण्याचा त्या जीवनावर होणारा परिणाम, किंवा त्या अव्यक्त जीवनानंतर पुन्हा प्राप्त होणारे व्यक्त जीवन याबद्दल अजून काहीही निश्चित झालेले नाही. आणि धर्मशास्त्र तर या कल्पना निश्चित धरूनच उभारलेले असते. तेव्हा आत्मा, परलोक, पुनर्जन्म इत्यादि आध्यात्मिक संस्कृतीचे जे मुख्य खांब त्यांना अजून शास्त्राचा यत्किंचितही आधार मिळाला आहे असे समजण्याचे मुळीच कारण नाही.
 पण हे तात्त्विक क्षेत्र सोडून दिले तरी या दोन संस्कृतीमध्ये आणखी