पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/२०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९५)

काही महत्त्वाचे फरक आहेत असे मानण्यात येते. पाश्चात्य हे जडवादी व म्हणूनच अगदी राक्षसी व क्रूर आहेत, जेथे जातील तेथे मूळच्या लोकांचा सहार करतील व ते नच साधले तर अत्यंत अन्यायाने दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा, राज्याचा व वित्ताचा अपहार करून आपला तळिराम गार करतील असे आपल्याकडे त्यांने वर्णन करण्यात येते. अबिसिनिया इटालीने घेतला तरी इंग्लंड वगैरे युरोपी राष्ट्रे अबिसिनियाच्या मदतीस धावली नाहीत, याची कारणमीमांसा सांगताना पुण्याच्या एका म्हाताऱ्या वर्तमानपत्राने म्हटले आहे की उदारता, दया ही बुद्धीच या जडवादी राष्ट्रात नाही. दुसऱ्याचा संहार झालेला पाहाण्यातच यांना आनंद होतो. आफ्रिकेची लूटमार करून मूळच्या मालकांना युरोपी लोकांनी नागविले व अडाणी निग्रोंना सुसंस्कृत केले नाही हे सांगून दुसऱ्या एकाने त्याच वर्तमानपत्रात युरोपी संस्कृती कशी राक्षसी आहे ते दाखविले आहे. डार्विनचे वगैरे उतारे देऊन कांही समाजशास्त्रज्ञही तसा प्रयत्न करीत आहेत.
 या न्यायदयावादी मंडळीनी युरोपवर हे आरोप करताना आर्यांचा जुना इतिहास विसरण्याची सोयीची पद्धत पाडली आहे. नाही तर स्वतःचा वेडगळपणा ध्यानात येण्यास त्यांना मुळीच उशीर लागला नसता. आफ्रिकेत शिरण्याचा इटलीला जर हक्क नाही तर हिंदुस्थानात येण्याचा आर्यांना काय हक्क होता ? येथे एक ठराविक पोपटी उत्तर देण्यात येते, की आर्यांनी हिंदुस्थान जिंकला हे खरे; पण मूळच्या लोकांना स्वधर्मात शूद्र म्हणून का होईना, त्यांनी जागा दिलीच आहे ! हे उत्तर मोठे मासलेवाईक आहे. दुसऱ्याच्या घरात शिरून त्यालाच चोर ठरवून वर घर झाडण्याचे हक्क त्याला दिल्याबद्दल टेंभा मिरवावयाचा अशापैकीच हे आहे. मालकाला मारून टाकला तर अगदी आसुरी कृत्य. मालकाला झाडू करून टाकला तर मात्र ते अगदी दैवीपणाचे लक्षण ! पण दैवीपणाचे लक्षण हेच असेल तर युरोपातले बहुतेक लोक दैवी संपत्तीनेच युक्त आहेत असे दिसेल. आर्यांनी अस्पृश्यांना ज्या सुखात ठेवले आहे, तितक्या सुखात अमेरिकेत सध्या निग्रो आहेतच. आफ्रिकेतल्या अनेक जातींचा संहार झाला असला तरी अस्पृश्यांइतक्या सुखात असलेल्या काही जाती अफ्रिकेतही सापडतील. आणि मुसोलिनी हबशी लोकांचा संहार न करता त्यांना झाडू इतपत मानाचे पद देऊन आर्यपणा करील याबद्दल