पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/२०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९६)

मला तर शंकाच नाही. साम्राज्यविस्तार हे आसुरीपणाचे लक्षण धरले तरी तेथेही आर्यांची पंचाइतच आहे. कारण पूर्वी हिंदुस्थान सोडूनही ब्रह्मदेश, सयाम, अनाम, अफगाणिस्थान या देशात हिंदूंचे साम्राज्य होते असा पुरावा अलिकडे उपलब्ध होत आहे. पण अगदी संहार केला तरच आसुरी, त्याच्या अलिकडे काहीही केले तरी दैवी, अशी सोईची व्याख्या मान्य केली तरीही फारसे निभत नाही. कारण आपल्या पुराणांतील अतिशयोक्ती काढून टाकून अगदी अल्प हाती लागणारे सत्य जरी पाहिले तरी आर्यांनी येथील रानटांचा अनेक ठिकाणी अनेक प्रकारे संहार केला आहे, असेच दिसून येईल. आज मितीला अमेरिकेत रेड इंडियन लोकांची जी स्थिती आहे तीच येथे वन्य जातींची आहे. आफ्रिकेत जसा निग्रो, किंवा अमेरिकेत जसा रेड इंडियन तसाच येथील कातकरी किंवा संताळ हा मालक होता. पण आर्यानी त्याला आज गिरिकंदरात धाडले आहे. येथील लोकांचा पूर्ण संहार झाला नसेल तर तो आर्यांच्या शस्त्रास्त्रांचा दोष आहे. दयाशीलता, विश्वबंधुत्व वगैरे गुणांची ती महती नव्हे. माझ्या मते आर्यांनी केले हेच फार चांगले केले. आजचे दैवी आर्य विश्वबंधुत्व करून स्वतःच्याच घरात उपरे होऊन बसले आणि आम्ही पारशांना, मुसलमानांना जो कोणी येईल त्याला पोटात घेतले आहे म्हणून, त्यातच दळभद्री ऐट करीत आहोत. त्यापेक्षा साम्राज्य वाढविणारे, अक्षरशः पराक्रम करणारे ते आसुरी आर्य फार बरे असे वाटते. युरोपियांनी आफ्रिकेच्या मूळ रहिवाशांना सुसंस्कृत केले नाही म्हणून ते राक्षसी हाही मुद्दा उलटल्यास वरच्या इतक्याच गैरसोयीचा आहे. कारण, कृण्वन्तो विश्रमार्यम् । ही घोषणा करणाऱ्या आर्यांनी अस्पृश्यांना व येथल्या गोंडसंताळांना किती सुसंस्कृत केले, किंवा तेही सोडून चातुर्वण्यात घेतलेल्या शूद्रवर्गाला काय संस्कृती दिली हे प्रसिद्धच आहे.
 यावरून असे दिसेल की पूर्वेची संस्कृती दैवी आहे व पश्चिमेची आसुरी आहे या म्हणण्यांत काही अर्थ नाही. व्यक्तीच्या व राष्ट्राच्या चारित्र्यात उदात्तता, स्वार्थत्याग, भूतदया, इत्यादि थोर सद्गुणांच्या ज्या परासीमा पूर्वेकडे दिसतात, त्या पश्चिमेकडेही तितक्याच उज्ज्वलपणे दिसतात. व लालसा, स्वार्थ, क्रूरता हे दुर्गुणही दोन्हीकडे सारखेच दिसतात. शस्त्रास्त्रांच्या प्रचंड शक्तीच्या शोधानंतर पूर्वेकडच्या लोकांच्या नशिबी जगद्विजय कर-