पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८)

मुळे तर कायमची वर्णव्यवस्था घातुक आहेच; पण या व्यवस्थेवर याहीपेक्षा बलवत्तर आक्षेप येतो तो असा की, त्या विभागणीच्या वेळी ज्या जाती हीन, नाकर्त्या शूद्र असतील त्या पुढे वाटेल तितक्या पराक्रमी होऊ शकतात, ही इतिहाससिद्ध गोष्ट त्या व्यवस्थेत दृष्टीआड केली जाते.
 शतकानुशतके हीन स्थितीत असलेल्या जाती एकदम कसा अतुल पराक्रम करू शकतात, याची उदाहरणे इतिहासात थोडी नाहीत. मोगल व तार्तर लोक कित्येक शतके धनगराचा पेशा पाळून होते; पण त्यांनी एके काळी तलवार उचलून सर्व जगाला त्राहि भगवान् करून सोडले. आरबांचे उदाहरण याहीपेक्षा निर्णायक आहे. तेही असेच धनगर होते. पण महंमद, ने त्यांच्यात जी काही अद्भुत जीवनशक्ती भरली, तिच्या प्रभावाने त्यांनी त्रिखंड जिंकले, एवढेच नव्हे तर आर्य ब्राह्मणांच्या तोडीची विद्वत्ताही प्रगट केली. महंमद बीन जबीर, अरकाझेल, चंद्राच्या विषमगतीचा शोध लावणारा महमद अबूल फीझल, हे ज्योतिर्विद, दृकशास्त्रवेत्ता अल्हाझेन, रसायन शास्त्री गीबर, कायदेपंडित शफी व मलिक हे सर्व पंडित आरब होते. सुप्रसिद्ध हरूण अल् रशीद हा राजा त्यांचाच व जगाला दिव्य मोहिनीने भारणारे अरेबियन नाईटस् त्यांचेच. अरबस्तानात किंवा तुर्कस्तानात मनुस्मृति मसती व त्यांनी ती पाळली असती तर या जातीचा उदयच झाला नसता. असे अनेक वेळा मनात येते को, ज्यांना आम्ही निकृष्ट वर्ग म्हणून ठरवून टाकले आहेत. त्यांच्यातूनही, येथे मनुस्मृतीचे आंधळे अनुयायी नसते तर, आरबांसारखेच पराक्रमी लोक निर्माण झाले असते. बाजीरावाने संधी दिल्याबरोबर धनगरांनी मल्हाररावासारखा वीरमणी निर्माण केलाच ना?
 वंशाचे, वर्णाचे, जातीचे गुण शतकानुशतके कायम टिकतात असे म्हणणारे, वंशधर्म शाश्वत व न बदलणारे आहेत असे मानणारे युरोपांतही काही पंडित आहेत व ते नाचलेले पाहून आपणही नाचणारे रा. गो. म. जोश्यांसारखे आमच्याकडेही लोक आहेत. वंशधर्मामध्ये फरक पडला तर फक्त संकरानेच पडेल असे हे लोक म्हणतात. त्यांना एवढेच सांगावयाचे की, त्यांनी हिंदुस्थानातील नाकरत्या झालेल्या ब्राह्मणजातीत, भिन्न गुण दाखविणाऱ्या कोकणस्थ, देशस्थ वगैरे महाराष्ट्रातील ब्राह्मणात, ज्यू लोकांत, शुद्धत्वातून क्षत्रियत्वास चढणाऱ्या मोगल व तार्तर लोकांत व ब्राह्मणत्वास