पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९२)

लागते. तसे असले म्हणजे त्या ध्येयापासून ते राष्ट्र किती मागे किंवा जवळ आहे हे मोजून त्यावरून प्रगती किंवा परागती ही ठरविता येईल. स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीची होणे ही रशियात प्रगती समजतात तर जर्मनीत परागती समजतात. धर्म नाहीसा होत चालला तर रशियाला ती प्रगती वाटेल तर हिंदुस्थानात त्यालाच अधःपात म्हणतील. कारण दोघांची ध्येये दिसावयास तरी भिन्न दिसत आहेत.
 तेव्हा प्रथम अखिल मानवजातीचे ध्येय काय आहे, निरनिराळ्या समाजाची निरनिराळी ध्येये असतात किंवा काय, असल्यास त्या भिन्नपणात कितपत अर्थ आहे, हे पाहून त्यावरून संस्कृती मोजण्याचे काही माप सापडते की काय ते ठरवून मग त्यावरून कोणचे कनिष्ठ हे ठरवावे लागेल त्याचीच चर्चा प्रस्तुत निबंधात करावयाची आहे.
 सर्व मानवजातीचे सुख हे ध्येय आहे. सुखाच्या कल्पना व्यक्तिपरत्वे भिन्न होतात हे खरे. दुसऱ्याच्या देहाला आग लावून देऊन त्याच्या किंकाळ्या ऐकत बसण्यात काहीना सुख वाटते, तर दुसऱ्याच्या किंकाळया थांबविण्यासाठी स्वतःचा देह अग्नीला अर्पण करण्यात काहीना सुख वाटते. सुखाच्या कल्पनांत जरी असे दोन ध्रवाइतके अंतर असले तरी मानव जी कोणची क्रिया करीत असतो ती त्याच्या कल्पनेप्रमाणे सुख मिळविण्यासाठीच करीत असतो यांत शंका नाही. मजूर शेतात राबतो, तो त्याला राबण्यात सुख वाटते म्हणून राबतो असा याचा अर्थ नव्हे. पण या राबण्याने संध्याकाळी भाकरी मिळेल, ही त्याला खात्री असते म्हणूनच तो राबतो हे निर्विवाद आहे. ती खात्री नाहीशी झाली तर तो काम करणार नाही. गुलाम अशाही स्थितीत काम करीत राहातो. भाकरी मिळेलच अशी त्याला खात्री नसते. पण येथेही नीट विचार केला तर असे दिसेल की काम न केले तर जे फटके बसतील, ते टाळण्यासाठी म्हणजे एक प्रकारच्या सुखासाठीच तो काम करीत असतो या प्रकाराला सुख म्हणणे विचित्र दिसेल. पण फटके खाणे ही स्थिती व काम करणे ही स्थिती यांत काम करणे ही स्थिती गलामाला बरी वाटत असते. म्हणजे तो सुखासाठी काम करतो असे जरी म्हटले नाही तरी दुःख टाळण्यासाठी करतो असे म्हणावेच लागले. या प्रकारच्या सुखाला दुःखाभावरूप सुख 'असे' टिळकांनी म्हटले आहे. या अगदी कनिष्ठ सुखापासून खाणेपिणे, नाचरंग,