पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९३)

वाचन, मनन, चिंतन अशा सुखाच्या श्रेष्ठ प्रती सुरू होतात. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक असे सुखाचे तीन प्रकार आहेत. अध्यात्मिक आनंदाला सुख हे नाव देऊन धर्मानेही सुख हेच मानवजातीचे ध्येय आहे हे मान्य केले आहे. इतकेच नव्हे तर तेच असावे असे सांगितले आहे. शारीरिक सुखापेक्षा मानसिक व मानसिकांपेक्षा अध्यात्मिक सुख श्रेष्ठ असे जरी म्हटले असले तरी अंतिम ध्येय सुख, याबद्दल कोणाचाच वाद नाही. पुनःपुन्हा ही गोष्ट सांगण्याचा हेतु असा. काही लोक धर्माच्या मते सुख हे मानवाचे ध्येय नसून हित हे आहे असे म्हणतात. सुख व हित या शब्दांचा विचार केला तर पुढील फरक दिसून येतो. आज कष्ट करण्यात तुला सुख वाटत नसले तरी त्यातच हित आहे असे, आपण विद्यार्थ्याला म्हणतो, पण येथे हित याचा अर्थ उद्यांचे सुख एवढाच आहे. व सुख की हित असा वाद करणाऱ्यांच्या मनात एवढाच फरक असेल तर अधिक ऊहापोह करण्याची जरुरी नाही. कारण मानसिक सुख मान्य करणाऱ्यांच्या मनात आजचेच सुख अभिप्रेत असणे शक्य नाही. अमुकच प्रकारचे सुख हे ध्येय असा आग्रह कोणीच धरीत नाही. तेव्हा धर्माने सुख हेच ध्येय मान्य केले आहे असे म्हणण्यास मुळीच हरकत नाही. निःश्रेयस, हित, कल्याण या शब्दांनी आध्यात्मिक सुख एवढेच अभिप्रेत आहे, असे गीतारहस्यात स्पष्ट म्हटले आहे. (पान ११६).
 आता शारीरिक सुख सोडून आध्यात्मिक सुख म्हणजे मोक्ष तू मिळव, असे सांगण्यात धर्माचा काय हेतु आहे असा प्रश्न येतो. पण याचे उत्तर अगदी सोपे आहे. तू आता भटक्या मारू नको, अभ्यास करण्यात तुला दुःख वाटत असले तरी अभ्यासच कर; त्यानेच तुला सुख मिळेल असे ज्या कारणासाठी आपण विद्यार्थ्यास सांगतो, त्याच कारणासाठी ऐहिक सुख सोडून तू मोक्षसुख मिळव असे धर्म सांगत असतो. आपल्या सांगण्याचे कारण उघड आहे. आता तू खेळलास तर तुला दहा मिनिटे सुख लागेल, पण अभ्यास केलास तर पुढील आयुष्यात दहा वर्षे सुखाची जातील, असा आपल्या सांगण्यांतील आशय असतो. म्हणजे अल्पकाल टिकणारे सुख सोडून देऊन दीर्घ काल टिकणारे सुख तू घे एवढेच आपण म्हणत असतो. समाजाच्या दृष्टीने याचे बरे-वाईटपण आपण पुढे पाहाणारच आहो. पण येथे येवढं स्पष्ट दिसते की सुखाच्या ऱ्हस्व-दीर्घत्वावरच आपला उपदेश अवलंबून असतो.