या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड. ]
सांख्यदर्शन प्रकरण १ लें.

१०५


टिकणारें सर्वज्ञत्व आणि सर्वशक्तिमत्त्व असणारा, आणि चिरकाल राह- णारा असा परमेश्वर असणे शक्य नाहीं असे त्यांचे मत आहे. असा परमेश्वर आहे असेंही घटकाभर गृहीत धरले, तर मुक्त अथवा बद्ध यांपैकी कोणत्यातरी अवस्थेत तो असला पाहिजे हैं उघड आहे. जर तो मुक्त स्थितीत आहे असे म्हटले, तर त्या स्थितीत तो विश्वाची उत्पत्ति करणार नाहीं हें उघड आहे. कारण, विश्वाची उत्पत्ति त्यानें कां करावी, याला कांहीं कारण सांगतां येत नाहीं. तो मुक्त म्हणजे पूर्णावस्थेत असतां तेथें कसल्याही प्रकारची इच्छा उद्भवण्याचा संभवच नाहीं. तसेंच तो बद्ध आहे असे म्हटलें, तर अर्थातच विश्वोत्पत्तीचें कार्य त्याच्याने होणार नाहीं. तो स्वतःच अपूर्ण आणि बद्ध असतां विश्व उत्पन्न करील हें संभवतच नाहीं. यामुळे चिरकाल टिकणारा, सर्वशक्तिमान् आणि सर्वज्ञ असा परमेश्वर ह्मणून कोणी नाहीं; त्याचें अस्तित्व शक्यच नाहीं; याकरितां श्रुतींत जेथें परमेश्वर असा शब्द आला असेल तेथें, तो पूर्णात्म्याला अनुलक्षून वापरला आहे असे समजावें असें श्रीक- पिलांचें म्हणणें आहे. सर्व आत्मे वस्तुतः एकरूप आहेत असे सांख्यदर्शनकार मानीत नाहीत. सर्व आत्मे ब्रह्माच्या ठिकाणीं एकरूप होतात असें वेदांताचें मत आहे; परंतु सांख्यदर्शनकार कपिल मुनि हे या दृष्टीने द्वैतवादी आहेत असे म्हणावयास हरकत नाहीं. दर्शनकार या नात्यानें त्यांनीं विश्वाची जी उपपत्ति लावली आहे तिची योग्यता नि:संशय फार मोठी आहे. श्रीकपिल मुनि हे आद्य दर्शनकार असून, त्यांच्या पाठीमागून जितकीं दर्शनें अस्तित्वांत आली त्यांच्या कर्त्यांनी, कपिलमताचा आधार अनेक प्रकारें घेतला आहे. यावरून त्यांची योग्यता केवढी आहे याचें अनुमान होईल.
 मुक्ति ही सर्व जीवात्म्यांच्या हक्काची बाब असून सर्वांना ती प्राप्त होईल अर्से सांख्यदर्शनाचें मत आहे. सर्वशक्तिमत्त्व आणि सर्वसाक्षित्व अमक्याला मिळावें आणि तमक्याला मिळू नये असें नाहीं. हीं मिळविण्याचा हक्क जितका एकाला, तितकाच दुसऱ्याला; आणि तितकाच सर्वांना आहे. आतां येथें एक प्रश्न असा उद्भवतो कीं जीवात्म्यांना बंधन केव्हांपासून प्राप्त झालें ? हें बंधन अनादि आहे असे या प्रश्नाचें उत्तर सांख्यांनी दिले आहे; पण हें बंधन जर अनादि आहे असे म्हटले, तर तें अनंतही असले पाहिजे असें म्हणणें ओघानेंच प्राप्त होतें. जर हें बंधन अनंत असेल तर त्यांतून आमची मुक्तता -