या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
कर्मरहस्य.

२१३


पहिला मोठा नियम नीट ध्यानांत ठेवला पाहिजे. सुदृढता हेच जीवित, आणि दौर्बल्य हाच मृत्यु. मनोबल हेच सुखसर्वस्व, हेच चिरंतन जीवित, हेच अमरत्व. दुबळेपणा, हाच रोग, दुःख आणि मृत्यु.
 आसक्ति हेच सध्या आपल्या सुखाचे साधन होऊन बसले आहे. आपली आपल्या मित्रांबद्दल आसक्ति, आपल्या इष्टमित्रांबद्दल आसक्ति, आपल्या बुद्धीबद्दल आणि धर्मकर्माबद्दल आसक्ति, प्रत्येक बाह्यविषयाबद्दल आसक्ति, आणि हैं सारें लटांवर गळ्यांत कशाकरिता बाळगावयाचे, तर सुख व्हावे ह्मणून ! पण याचा परिणाम काय होतो ह्मणाल, तर दुःख मात्र हटकून मिठी मारतें. ख-या आनंदाची प्राप्ति करून घेणे असेल, तर अनासक्त होण्यावांचून दुसरा उपाय नाही. आपल्याला इच्छा होण्याबरोबर या सर्वांना एकदम तोडून टाकण्याचे सामर्थ्य आमच्यांत असेल, तर आम्हांस दु:खें शिवणारही नाहींत. अत्यंत आसक्त मनुष्य ज्या उत्साहाने एखाद्या कार्याच्या मागे लागतो, तितक्याच उत्साहाने एखादे कार्य करीत असतांही, वाटेल त्याक्षणीं त्यांतून मोकळे होण्याचे सामर्थ्य ज्याला असेल, तोच मनुष्य शक्य तितकें सुख प्रकृतीपासूननिसर्गापासून मिळवू शकतो. अत्यंत महत्त्वाची पण अत्यंत कठीण अशी गोष्ट हीच आहे, की कार्य करण्यास लागणारें आसक्तीचे बळ आणि त्यांतून बाहेर पडण्यास लागणारे अनासक्तीचे वळ ही समसमान असावीं. कांहीं माणसे अशी असतात, कीं तीं बाह्यतः अनासक्तशी दिसतात. त्यांची कोणत्याही वस्तूबद्दल आसक्ती असत नाही. त्यांचे कोणावरच प्रेम नसते. त्यांचे हृदय जणुंकाय दगडाचे बनले आहे. जगापासून ती सदोदित पराङ्मुख. अशी मनुष्ये कधी दुःखांत चूर झालेली आढळावयाची नाहीत; पण या सृष्टीत यांची खरी किंमत काय असते ? या भिंतीला साच्या जन्मांत कधीतरी दुःख झाले होते काय? तिचे कधी कोणावर प्रेम जडले नव्हते. ती अगदी अनासक्त; पण शेवटी भिंत ती भिंतच. नुसता चिखलाचा गोळा. असली .भिंत होऊन बसण्यापेक्षा, आसक्त होऊन दुःखें भोगणेही शतपट बरें. अशा रीतीने भिंत होऊन जगांतील दु:खें टाळतां येतील हे खरे; पण जगांतील आनंदही त्यामुळे टळतात आणि त्यामुळे चित्ताला दौर्बल्यही येतेच. याकरितां दगड होऊन बसणे हे युक्त नाही; हें आपलें साध्य नाहीं. एक प्रकारचे दौर्बल्य गेले आणि दुस-या प्रकारचे आले; हाही एक प्रकारचा मृत्यूच नव्हे तर काय ? दगडाचें जीवित हेच आपलें इष्ट आहे काय ?