पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/106

हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या शिबिर, उपक्रमांतून खांडेकरांची बौद्धिके, व्याख्याने नित्य होत राहिली. त्या वेळी भाई माधवराव बागल यांनी ‘अखंड भारत' नावाचे साप्ताहिक सुरू केले होते. वि. स. खाडेकरांची ‘वटपत्रे' ही पत्रात्मक कादंबरी या साप्ताहिकांतून क्रमशः प्रकाशित होत होती. ती अद्याप अप्रकाशित आहे. कोल्हापूरच्या सर्वच वृत्तपत्रांतून वि. स. खांडेकर लिहीत होते. स्वातंत्र्योत्तर काळात नामदेवराव व्हटकर हे दलित कार्यकर्ते ‘दलित सेवक' नियतकालिक प्रकाशित करीत असत. त्यातही खांडेकर अस्पृश्यता निर्मूलनासंबंधी लिहीत. अशा लेखांचे एक पुस्तक ‘ध्वज फडकत ठेवूया' सन १९७५ ला प्रकाशित झाले. या पुस्तकाने दलित साहित्यास मोठी प्रेरणा देण्याचं ऐतिहासिक कार्य केले.
 वि. स. खांडेकरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भाई माधवराव बागल यांच्यावर लेख लिहून त्यांच्या पुरोगामी कार्य कर्तृत्वाचा गौरव केला । होता. यशवंतराव चव्हाण कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये शिकत असताना वि. स. खांडेकरांचे साहित्य नित्य वाचीत. आपली घडण करण्याचे श्रेय ते वि. स. खांडेकरांना देत आले आहेत.
 महाराष्ट्राच्या स्वतंत्र राज्यनिर्मितीनंतर मराठी भाषा व साहित्यास प्रोत्साहन देणाच्या ज्या अनेक घटना घडल्या त्यांतून एका नव्या सांस्कृतिक पर्वाचा शुभारंभ झाला. उत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्कारांचा प्रारंभ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, शिवाजी विद्यापीठ निर्मिती या सर्वांत वि. स. खांडेकरांची भूमिका साहाय्याची राहिली. सन १९६२ ला शिवाजी विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांत वि. स. खांडेकर होते. शिवाजी विद्यापीठांत त्यांची अनेक व्याख्याने झाली. विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमात वेळोवेळी खांडेकर साहित्याचा अंतर्भाव करून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला. वि.स.खांडेकरांना भारतीय ज्ञानपीठाचे मराठीस मिळालेले पहिले पारितोषिक लाभले. शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट्. पदवी बहाल करून गौरविले.

 वि. स. खांडेकरांनी समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आचारधर्म म्हणून स्वीकारली होती. ती स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आलेल्या नव्या पिढीत रुजावीत म्हणून आंतरभारती शिक्षण मंडळाची स्थापना केली व आंतरभारती विद्यालय सुरू केले. त्याच्या माध्यमातून वि. स. खांडेकरांनी संस्कारशील शिक्षणाचा प्रारंभ कोल्हापुरात केला.

वि. स. खांडेकर चरित्र/१०५