पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/116

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 या नवप्रकाशित साहित्याच्या नव्या आवृत्त्याही सतत प्रकाशित होत आहेत. यावरून वि. स. खांडेकर हे एकविसाव्या पिढीच्या वाचकांचेही लेखक आहेत हे सिद्ध होतं. वि. स. खांडेकरांच्या जीवन व साहित्याचा पुनर्शोध घेत एक तप मागे पडले. या पुनर्शोधात माझ्या असं लक्षात आलं आहे की, खांडेकर हे सार्वकालिक (Perpetual) साहित्यकार होत. त्यांचं हे सार्वकालिकत्व त्यांच्या लेखनसमग्रतेतूनही येतं. खांडेकरांनी कथाकादंबरीशिवाय लघुनिबंध, रूपककथा, भाषांतर, संपादन, नाटक, कविता, पटकथा, आत्मकथा, वैचारिक, समीक्षा, व्यक्तिलेख, स्तंभलेखन, चरित्र, व्यक्ती आणि वाङ्मय, पत्रलेखन, मुलाखती अशा विविध रूपांतून आपले विचार, साहित्य, दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. साहित्यिक खांडेकर चतुरस्त्र साहित्यिक म्हणून पुढे येतात, ते या बहुआयामी लेखनामुळे. खांडेकरांच्या कादंबऱ्या आपणास समाजवाद, गांधीवाद, आदर्शवाद समजावत समानता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षतेसारखी जीवनमूल्ये देतात. ‘क्रौंचवध' कादंबरीत निषाद क्रौंच पक्ष्याचा वध करतो. त्या निषादापाशी धनुष्यबाण आहेत. प्रत्येक अन्यायाच्या पाठीशी अशीच पाशवी शक्ती उभी असते. ही शक्ती बुद्धीला विचारीत नाही किंवा भावनेला भीक घालीत नाही. संहारक उन्मादाच्या नादात ती तांडवनृत्य करीत सुटते. तिच्या उन्मत्त टाचांखाली चिरडले जाणारे निरपराधी जीव तडफडत, चित्कारत राहतात; पण त्या चित्कारांनी अन्याय्य हृदयाला थोडासुद्धा पाझर फुटत नाही. फुटणार कुठून? विनाशातच त्याला पुरुषार्थ वाटतो. पाशवी शक्तीच्या प्रदर्शनातच त्याच्या अहंकाराचे समाधान होते. या खांडेकरांच्या कालत्रयी चिंतनाचं सार्वकालिकत्व ज्यांना अनुभवायचे असेल त्यांनी ‘निषाद'च्या जागी कसाब घालून वाचलं तरी पुरे. (मग बाणाची जागा बंदूक आपोआप घेईलच!)

 खांडेकरांच्या कथा आजही वाचल्या जातात; कारण वैश्विक कथेची सर्व वैशिष्ट्य त्यांत आढळतात म्हणून. ओ हेन्रीचे कलाटणी तंत्र (नाट्य), चेकॉव्हची चिकित्सा शैली, फ्रॉइडचे मनोविश्लेषण, मार्क्सचे द्वंद्व, सामाजिक घालमेल (दोन पतंग, ऊन-पाऊस, स्वर्ग आणि नरक इत्यादी कथा) महात्मा गांधींची मूल्यधारणा, समाजवादाचे पंचशील घेऊन येणारी खांडेकरांची कथा माणसाच्या सार्वकालिक समस्या चित्रित करते. तीच गोष्ट रूपक कथांची. 'बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी' असो वा शेवटची ‘मृत्यू' किंवा अगदी प्रारंभीची ‘चकोर आणि चातक' सर्वांत कला आणि विचाराचे अद्वैत, कल्पनाविलासातील तार्किकता, भाषासौंदर्य यांमुळे खांडेकरांच्या रूपककथा पंचतंत्रातील निसर्ग आणि इसापनीतीतील बोध घेऊन अवतरतात.त्यात मनोरंजकताही असते व वाचकास अंतर्मुख करण्याची शक्तीही!

वि. स. खांडेकर चरित्र/११५