पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/122

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘सुगम अँगे'च्या अखंड पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या. त्या कादंबरीच्या ‘उषा' नायिकेने तत्कालीन तरुण वाचकांना इतकं वेड लावलं की, १९४0 ते १९६० या दोन दशकांत आपल्या पत्नीचं नाव उषा ठेवण्याची मोठी लाट तत्कालीन प्रांतात आली होती. एका तरुणाने शेकडो पत्रे लिहून उषाचा शोध घेण्याचा आटापिटा केल्याचं सांगितलं जातं. खांडेकरांच्या १० कादंबऱ्या व सुमारे १०० कथांची तमिळमध्ये भाषांतरे उपलब्ध आहेत. तमिळ कथा, कादंबऱ्यांच्या इतिहासलेखनात ‘खांडेकरी साहित्य' असा स्वतंत्र कालखंड आजही नोंदविला जातो, यावरून खांडेकर साहित्याचे तमिळ भाषेतील महत्त्व लक्षात येते.

 जे कार्य का. श्री. श्रीनिवासाचार्य यांनी तमिळमध्ये केलं तसंच विपुल भाषांतर गोपाळराव विद्वांस यांनी गुजरातीत केलेलं दिसतं. विद्वांस यांनी सन १९४४ ला ‘क्रौंचवध' कादंबरीचे गुजरातीत भाषांतर केले. सन १९५२ ला त्या अनुवादाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली, तेव्हा गुजराती कादंबरीकार कै. रमणलाल व. देसाई यांनी खांडेकरांचं गुजरातीतील महत्त्व अधोरेखित करताना लिहिलं आहे, ‘मराठी कादंबरीकार श्री. खांडेकर हे गुजराती बहुजन समाजात अतिशय प्रिय झाले आहेत. परभाषेतील लेखक जेव्हा आपणास असा प्रिय वाटू लागतो, तेव्हा त्या लेखकापाशी काही त्याचे असे मूलभूत स्वत्व आहे, महत्त्व आहे, खरीखुरी मानवता त्यांच्या अंगी मुरलेली आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.' गुजराती भाषेत वि. स. खांडेकर साहित्याच्या भाषांतराचा प्रारंभ सन १९३९ मध्ये कै. हरजीवन सोमैया यांनी केला. त्यांनी 'दोन ध्रुव' कादंबरी गुजरातीत अनुवादिली; पण खांडेकरांना गुजरातीत मान्यता मात्र मिळवून दिली ‘क्रौंचवध' कादंबरीने. सन १९४४ ला तिचे भाषांतर प्रकाशित झाल्यावर ‘जन्मभूमी' या गुजराती प्रमुख वृत्तपत्राने आठ कॉलम समीक्षा प्रकाशित करून ‘क्रौंचवध' प्रत्येक गुजराती घरात पोहोचवली. या भाषांतराची ही एक गंमत सांगितली जाते. ‘क्रौंचवध' गुजराती भाषांतर प्रकाशित केले, ते गुजरातीतील प्रथम क्रमांकाचे प्रकाशक आर. आर. शेठ आणि कंपनी यांनी. त्यांनी करार केला १००० प्रती प्रकाशित करण्याचा; पण प्रत्यक्षात छापल्या मात्र ५०० प्रती. गुजराती वाचकांना त्या वेळी भाषांतरे वाचण्याची सवय नव्हती. भाषांतर चालेल की नाही अशी शंका प्रकाशकांच्या मनात; पण त्यांना नंतर मात्र ‘क्रौंचवध'च्या अनेक आवृत्त्या वाचक पसंतीमुळे प्रकाशित कराव्या लागल्या, गुजरातीत आजमितीस १३ कादंबऱ्या, १० लघुकथासंग्रह, २ रूपक कथासंग्रह, २ लघुनिबंधसंग्रह शिवाय १ सुभाषित संग्रह भाषांतरित रूपात प्रकाशित आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/१२१