पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/128

हे पान प्रमाणित केलेले आहे.

साहित्यास इंग्रजीत Graceful Literature' शिवायही अनेक पर्यायवाची शब्द वापरण्यात येत असतात. जसे की Creative writing, Artistic writing, Literature, memorable writing, Imaginative writing. अशा विविध छटांच्या शब्दांतूनही ललित साहित्याचे घटक, वैशिष्ट्ये लक्षात येत असतात. त्या सर्वाधारे वि. स. खांडेकरांच्या नवसंपादित परंतु अचर्चित ललित साहित्याचे लालित्य समजून घेणे वेधक ठरते.

 ‘नवी स्त्री' ही वि. स. खांडेकरांची सन १९५० ला 'वसंत' मासिकात क्रमशः लिहिलेली कादंबरी; पणती पुस्तकरूपात प्रकाशित झाली ती सन २००१ ला. योगायोगाने ते ‘महिला सबलीकरण वर्ष, होते. खांडेकरांना अपेक्षित नवी स्त्री केवळ आधुनिक, सुशिक्षित नको होती. नव्या स्त्रीच्या संस्कारीकरणात तिची 'माणूस' म्हणून घडण ते अपेक्षित होते. केवळ वज्रमुठीनं वा ‘इन्किलाब झिंदाबाद'च्या घोषणा देत नव्या स्त्रीस आधुनिक होता येणार नाही. तिला आपल्या हक्कांची जाणीव हवी, कायद्याचे ज्ञान हवे. १४४ कलम तिला माहीत हवे म्हणणारे खांडेकर द्रष्टे साहित्यिक म्हणून ५० वर्षे पुढे होते. आजही इंडियन पिनल कोडची कलमे एल. एल. बी. झालेल्या स्त्रिया अपवादानेच सांगू शकतील. नवी स्त्रीचे कथानक खांडेकरांच्या मनात अंकुरले ते कोकणातील स्त्रीचे दैन्य, दारिद्र्य, दुःख, अत्याचार पाहून पिळवटून. घराचा उंबरठा लक्ष्मणरेषा मानून पिचणारी श्रमजीवी स्त्री त्यांनी पाहिली, अनुभवली व मग त्यांच्या मनात ‘नवी स्त्री'ची नायिका ‘ललिता' जन्मली. पुनर्विवाह करणे, पदवीधर होणे, नवऱ्याबरोबर फिरायला जाणे त्या वेळी (१९५०) ‘शतकृत्य' समजले जायचे. अशा काळात खांडेकर या कादंबरीतून प्रौढविवाह, प्रेमविवाह, आंतरजातीय विवाहाचे समर्थक होतात. तत्कालीन स्त्रीचे खांडेकरांनी केलेले ललित वर्णन म्हणजे, या क्षणी आकाशात आनंदाने हसणारी, पण दुसऱ्याच क्षणी खळकन तुटून पाषाण होऊन पृथ्वीवर पडणारी तारका!' ‘नवी स्त्री'मधील पात्रे नायिका ललिता, तिचे वडील तात्यासाहेब, मित्र दिवाकर सर्व जण समाजवादी समाजरचना अवतरावी म्हणून प्रयत्नशील असतात. तिकडे दुसरीकडे मगनभाई, काकासाहेब, कमलाकर भांडवलशाही समर्थक. अशा संघर्षात शिक्षित ललिता व्यष्टीपेक्षा समष्टी श्रेष्ठ मानून त्यागमय जीवन घेऊन उभी राहते. स्वतःबरोबर समाजास बदलायचा तिचा ध्यास म्हणजे गांधीवाद, मार्क्सवाद, समाजवाद इत्यादी तत्त्वज्ञानातून उभारलेल्या विविध सामाजिक, राजकीय चळवळींतील स्त्रीसहभाग व नेतृत्वाचे प्रतीक. स्त्रीची पुरोगामी घडण चित्रित करण्याच्या उद्देशाने

वि. स. खांडेकर चरित्र/१२७