पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/140

हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून मी त्यांचं अनुगमन करतो. 'रडका लेखक' म्हणून उपहास करणा-यांना साने गुरुजींचा पाझर येणार तरी कुठून? दुस-याच्या पोटी जन्मलेल्या बाळासाठी आपली भरली छाती रिकामी करणारी पन्हा धाय ज्याला माहीत असते त्यालाच परहितार्थ समर्पणाचा अर्थ उमजणार. संवेदना सूचकांक सतत सजग नि सर्वोच्च ठेवणारं खांडेकरी साहित्य वाचणं वेगळं नि जीवन पाथेय, इप्सित म्हणून स्वीकारणं वेगळं.
 अलीकडेच मी वि. स. खांडेकरांनी वेळोवेळी लिहिलेल्या व्यक्तिलेखांचे तीन संग्रह संपादित करून प्रकाशात आणलेत. साहित्यशिल्पी', ‘समाजशिल्पी’ आणि ‘जीवनशिल्पी' शीर्षकं आहेत त्यांची. खांडेकरांनी पूर्वसूरी व समकालीन साहित्यिकांबद्दल समन्यायी लेखन केलं. पूर्वसुरींबद्दल आदर, कृतज्ञता, तर समकालीनांबद्दल प्रीती, सद्भाव. हे सारं येतं जीवनाबद्दल असलेल्या आस्थेतून आणि जीवन ऊर्जस्वल बनविण्याच्या ध्यासातून. कोल्हटकर, खाडिलकर, देवल, हरिभाऊ, केळकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन खांडेकर लिहितात. आगरकर टिळक, गांधी यांच्या राजकीय सुधारणा विषय कार्यक्रमांबद्दल त्यांना आदर असतो. तो समाज पुढे नेण्याच्या त्यांच्या धडाडी आणि धडपडीमुळे. अल्बर्ट श्वाइत्झर असो वा डॉ. शंकरराव भिसे असो; त्यांची विज्ञाननिष्ठ वृत्ती त्यांना हवीहवीशी वाटत; कारण परंपरा गाडल्याशिवाय विज्ञानमूल्ये अवतरणार नाहीत याची खांडेकरांना खात्री असते. खांडेकर महर्षी शिंदे, राजर्षी छ. शाहूंबद्दल लिहितात, तेव्हा त्यांना माहीत असतं की, बहुजन समाज पुढारल्याशिवाय देश सुधारणार नाही.

 सामान्यांच्या मनातील छोट्या-छोट्या शंकांना खांडेकरी साहित्य समुपदेशकाच्या भूमिकेतून मदत, मार्गदर्शन करीत राहतं. म्हणून त्यांना जाऊन तीन दशके लोटली तरी खांडेकरी साहित्याचे पारायण पिढी-दरपिढी होत राहते. आवृत्त्यांवर आवृत्त्या येणं हे कशाचं लक्षण? मागे मी प्रा. ग. प्रधान यांना प्रत्यक्ष भेटून मी संपादित केलेली काही पुस्तके भेट द्यायला गेलो होतो. आता ‘साधनेचे कार्यालय असणाऱ्या घरात पत्नी आजारी होती. प्रधान सर शुश्रूषा करीत होते. वय वर्ष ८१ होतं. पुस्तकं देऊन परतलो. दोनच दिवसांत पत्र आलं. 'तुमच्या संपादित केलेल्या पुस्तकांनी मी ८१ वयाचा वृद्ध एकदम १८ वर्षांचा तरुण झालो. खांडेकरांची ‘उल्का' कादंबरी मी १८ व्या वर्षीच वाचली आणि मी ध्येयवादी झालो. ८१ व्या वर्षीही तो ध्येयवाद अटळ आहे. हे खांडेकर साहित्याचे सामर्थ्य मलाही काही तरी विधायक खटाटोप करण्याचा मंत्र देत राहतं.

वि. स. खांडेकर चरित्र/१३९