पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/143

हे पान प्रमाणित केलेले आहे.

(ए) वि. स. खांडेकर साहित्याची प्रस्तुतता

 मराठी भाषा आणि साहित्यास भारतीय बनविण्याचं ऐतिहासिक कार्य वि. स. खांडेकरांनी केले. भारतीय ज्ञानपीठाचा मराठीस लाभलेला पहिला पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांच्या 'ययाति' कादंबरीने भोगलोलुप होत चाललेल्या समाजास त्यागाची शिकवण दिली. वि. स. खांडेकर मराठी साहित्यक्षितिजावर अवतरले सन १९१९ मध्ये. सन १९७६ ला त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते अखंड लिहीत राहिले. सुमारे सहा दशकांच्या लेखनकाळात वि. स. खांडेकरांनी प्रचुर नि बहुआयामी लेखन केले; त्याच्या जीवनात त्यांनी विपुल लेखन केलं. पण हयातीत म्हणाल तर १६ कादंब-या, ३९ कथासंग्रह, ११ निबंधसंग्रह, ३ रूपककथा संग्रह, १ प्रस्तावना संग्रह, ८ लेखसंग्रह, ४ व्यक्ती आणि वाङ्मय ग्रंथ, १ व्यक्तिलेख संग्रह, १ चरित्रग्रंथ, १ आत्मचरित्र, ३ भाषांतरे, ३ भाषणसंग्रह, १ नाटक, ३५ संपादित ग्रंथ अशी सुमारे सव्वाशे पुस्तकं प्रकाशित झाली. सर्वसाधारणपणे लेखकाबरोबरच त्याच्या लेखन-प्रकाशनाचा ओघ थांबतो असं आपण पाहतो; पण वि. स. खांडेकर हे मराठीतील अपवाद लेखक म्हणायला हवेत. त्यांच्या निधनाला सुमारे ३० वर्षे होत आली. त्यांच्या पूर्वप्रकाशित साहित्याच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या प्रकाशित होत आहेत. एकट्या ‘ययाति' कादंबरीची पस्तिसावी आवृत्ती सध्या विकली जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांचं अप्रकाशित, असंकलित साहित्य शोधून काढून संशोधक, संपादक वर्तमान पिढीनं न वाचलेलं साहित्य संपादित करून प्रकाशित करीत आहेत. खांडेकरांच्या मृत्यूनंतर असे नवसाहित्य किती प्रकाशित झाले? असे पाह लागलो तर लक्षात येते की, १ कादंबरी, ३ व्यक्तिलेखसंग्रह, २ आत्मचरित्रात्मक पुस्तके, १ मुलाखतसंग्रह, १ पटकथासंग्रह, २ कवितासंग्रह,

वि. स. खांडेकर चरित्र/१४२