पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/33

हे पान प्रमाणित केलेले आहे.

ऑगस्टच्या शेवटी त्यांना मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. उपचार घेत असतानाच त्यांचे २ सप्टेंबर, १९७६ रोजी मिरज येथे दुःखद निधन झाले. नंतर त्यांची कोल्हापुरात 'न भूतो न भविष्यती' अशी अंत्ययात्रा निघाली. त्यात मी एक पाईक होऊन अंतिम श्रद्धांजली अर्पण केली होती.

 मला खांडेकरांचा सहवास सन १९६३ पासून लाभला तो त्यांनी स्थापन केलेल्या आंतरभारती विद्यालयाचा विद्यार्थी म्हणून. नंतर त्याच शाळेत मी हिंदी शिक्षक झालो. त्या काळातही सतत भेटणे, बोलणे होत राहायचे. त्यांच्या आचार, विचारांचे व साहित्याचे संस्कार मजवर झाल्यानेच मी मूल्यनिष्ठ जीवन जगू शकलो, अशी माझी विनम्र धारणा आहे. त्यांच्या या ऋणाची परतफेड म्हणून शिवाजी विद्यापीठ व खांडेकर कुटुंबीय यांच्या मदतीने वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय सन २००२ ते २००४ मध्ये शिवाजी विद्यापीठात उभारू शकलो. सन २००१ ला त्यांच्या निधनास २५ वर्षे झाली. रजत स्मृती म्हणून त्यांच्या असंकलित व अप्रकाशित साहित्याचे संपादन केलं. कथा, कादंबरी, लघुनिबंध, आत्मकथा, वैचारिक लेख, मुलाखती, समीक्षात्मक लेखसंग्रह, पटकथा अशी २० नवी पुस्तके प्रकाशित झाली. व्यक्तिचित्रे, भाषणे, विनोदी लेख, 'वैनतेय'चं लेखन अशी आणखी पाच पुस्तके प्रकाशित करून त्यांची रजत स्मृती पूर्ण होईल. हे चरित्रलेखनही त्यांच्या मजवरील संस्कारांचीच उतराई होय.

वि. स. खांडेकर चरित्र/३२