पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/35

हे पान प्रमाणित केलेले आहे.

निरंतर अस्वस्थता जोपासणारे साहित्यिकच नव्या समाजाची स्वप्नं पाहू शकतात, हे खांडेकरांच्या व्यक्ती व वाङ्मयाचा अभ्यास करताना प्रकर्षाने प्रत्ययास येते. जीवन व कलेचं अद्वैत हे त्यांच्या समग्र साहित्याचे वैशिष्ट्य सांगता येईल. पांढरपेशा मध्यमवर्ग हा त्यांच्या जीवनाचा परीघ असला तरी त्यांच्या साहित्यविषय व आशयास असं कुपमंडूक कुंपण नव्हते. वैश्विक मनुष्यजीवन मूल्याधारित होऊन ते विकसित व्हावे व सतत उन्नत, उर्ज्वस्वल होत राहावे अशी धडपड करणारा, ध्यास घेतलेला हा लेखक, त्याची माणसाविषयी असलेली तळमळ त्यांच्या साहित्यातील समग्र पटलावर सतत संवेदी जागरूकता व्यक्त करते.
कादंबरीकार
 सन १९३० साली ‘हृदयाची हाक' लिहून वि. स. खांडेकरांनी मराठी कादंबरीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं ते भीतभीतच. त्यांच्याच शब्दांत सांगायचं, तर 'महाराष्ट्र शारदा मंदिराच्या कादंबरीच्या दालनात मी आज भीतभीतच पाऊल टाकीत आहे. हरिभाऊ आपट्यांपासून प्रो. फडक्यांपर्यंतच्या काळात अनेक कुशल लेखकांनी विभूषित केलेल्या या वाङ्मयविभागात प्रवेश करताना नावीन्याच्या आनंदाच्या छायेपेक्षा अपयशाच्या भयाची सावली मनावर अधिक पसरली, तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. तथापि आजच्या सुरवंटांचीच उद्या फुलपाखरे होतात, हा सृष्टीनियम ध्यानात आणून मी हे धाडस केले आहे. अन् झालंही तसंच. ययाति'ला ज्ञानपीठ मिळवून त्यांनी आपल्या कादंबरीकाराचं फुलपाखरू झाल्याचं पुढे सिद्ध केलं.
 पैसा, सत्ता, संपत्ती, ज्ञान, कीर्ती, प्रसिद्धी अशा अनेक हाका घालत मनुष्य जगत असतो; परंतु त्याने त्याचे समाधान होत नाही. त्याची खरी भूक असते प्रेमाची. ही हृदयाच्या हाकेतूनच मिळते, हे खांडेकरांनी कमल आणि दिवाकर, कुसुम आणि प्रभाकर तसेच डॉ. भागवत अशा तीन प्रेमी युगुलांतून, त्यांच्या दांम्पत्यजीवनातून अनुभवाचा पैस विस्तारत स्पष्ट केलं आहे. ही त्यांची पहिलीच कादंबरी असल्याने या कादंबरीच्या कलात्मक मर्यादा लक्षात घेतल्या तरी तिच्यातील हा विषय व आशयाच्या अंगांनी तिने वाचकांशी केलेल्या हार्दिक संवादामुळे ती यशस्वी ठरली आणि त्यामुळेच खांडेकर ‘कांचनमृग' (१९३१) लिहिण्याचे धाडस लगेच करू शकले.

 ‘कांचनमृग' लिहिताना त्यांचा आत्मविश्वास दुणावल्यामुळेच असेल कदाचित, त्यांनी 'कांचनमृग'च्या छोट्या प्रस्तावनेत आपल्या आगामी कादंबरी लंकादहन'ची घोषणा केली.

वि. स. खांडेकर चरित्र/३४