पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/48

हे पान प्रमाणित केलेले आहे.

सम्राटच नव्हते, तर मराठी कथेचे ते शिल्पकारही होते, याची साक्ष देण्यास त्यांची ‘बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी' कथा पुरे!
लघुनिबंधकार
 लघुनिबंध हा मराठी साहित्यातील आधुनिक ललित वाङ्मयप्रकार होय. मराठीत प्रा. ना. सी. फडके त्यांचे प्रवर्तक असले तरी त्याचे संवर्धन वि. स. खांडेकरांनी केले. प्रा. ना. सी. फडके यांनी त्याला ‘गुजगोष्टी' असे नाव दिले होते. हा वाङ्मय प्रकार इंग्रजीतून मराठीत आला. इंग्रजीत लघुनिबंध लिहिण्याची परंपरा फ्रेंच निबंधकार माँटेन (१५३३-१५९२) पासून मानली जाते. इंग्रजीत चार्लस लॅब यांनी (१७७५-१८३४) तो रूढ केला. ल्युकास, गार्डिनर, लिंड, बेलॉक, मिल्ले, चेस्टरटन, प्रीस्टली अशी लघुनिबंधकारांची मोठी फळी इंग्रजीत आढळते, तशी ती मराठीतही. फडके, खांडेकरांशिवाय अनंत काणेकर, गो. नि. दांडेकर, बा. भ. बोरकर, र. गो. सरदेसाई, वा. भ. पाठक, शंकर साठे, य. गो. जोशी, रघुवीर सामंत ही अशी काही नावे सांगता येतील.

 वि. स. खांडेकरांच्या लघुनिबंध लेखनाचा प्रारंभ साप्ताहिक ‘वैनतेय'मध्ये प्रकाशित ‘निकाल द्या' (How's That) ने झाला. तो २२ फेब्रुवारी, १९२७ रोजी प्रकाशित झाला. त्यांचा शेवटचा लघुनिबंध 'शब्द आणि शब्द’ ‘अरुंधती' मासिकाच्या दिवाळी अंकात सन १९७६ ला प्रकाशित झाला. लघुनिबंध लेखनाच्या ५० वर्षांच्या वाटचालीत खांडेकरांनी सुमारे पावणेतीनशे निबंध लिहिले. पैकी ‘वायुलहरी' (१९३६), ते ‘रिमझिम (१९६१) पर्यंत प्रकाशित त्यांच्या ११ लघुनिबंध संग्रहांत २१३ निबंध संग्रहित आहेत. उर्वरित ६४ निबंध खांडेकरांच्या रजत स्मृतिप्रीत्यर्थ मी संपादित केलेल्या ‘रानफुले' (२००२), ‘अजून येतो वास फुलांना (२००३), ‘मुखवटे' (२००४) आणि ‘सांजसावल्या' (२००४) मध्ये आहेत. वि. स. खांडेकरांच्या समग्र लघुनिबंध संग्रहाची सूची ग्रंथाच्या शेवटी जोडलेल्या साहित्यसंपदा'मध्ये (परिशिष्ट ३ पाहा) आहे.
 वरील संग्रहांशिवाय खांडेकरांचे चांदण्यास', ‘अविनाश', 'मंदाकिनी', ‘मंजिच्या', 'कल्पलता', 'तिसरा प्रहर', 'मंझधार’, ‘झिमझिम' इत्यादी जे लघुनिबंध संग्रह आहेत, त्यांतील निबंध वाचताना लक्षात येते की, या निबंधांचा नायक लेखक स्वतः असतो. तो वाचकांशी गुजगोष्टी करतो. त्यातून तो स्वतःच्या आवडीनिवडी, फजिती, प्रसंग, सामाजिक समस्या, इत्यादींवर भाष्य किंवा संवाद करतो. आपल्या लघुनिबंधांचा प्रारंभ खांडेकर विविध प्रकारे करीत असले तरी त्यात चिंतन भरलेलं असतं.

वि. स. खांडेकर चरित्र/४७