पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/57

हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रस्तावनाकार
 वि. स. खांडेकरांनी आपल्या पुस्तकाला ‘दोन शब्द', 'चार शब्द', ‘पार्श्वभूमी' अशा शीर्षकांनी प्रस्तावना लिहिली नाही, असं पुस्तक अपवाद म्हणावं लागेल. खांडेकरांनी स्वतः लिहिलेला, संपादित केलेल्या शंभरएक, पुस्तकांशिवाय इतर अनेकांच्या पुस्तकांना लिहिलेल्या अन्य त्रेसष्ठ प्रस्तावनांची सूची जया दडकरांनी आपल्या ‘वि. स. खांडेकर वाङ्मय सूची'मध्ये नोंदविली आहे. इतक्या बहुल संख्येने प्रस्तावना लिहिणारे खांडेकर मराठी साहित्यातील या संदर्भातील विक्रमी लेखक म्हणून ओळखले जातात. एखाद्या लेखकाच्या प्रस्तावना विचारणीय आणि नोंद घेण्यासारख्या, चिकित्सक वाटाव्यात, हे त्या प्रस्तावनांचे महत्त्व अधोरेखित करण्यास पुरेसे ठरावे. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांनी वि. स. खांडेकरांच्या उल्लेखनीय प्रस्तावना संपादित करून त्या विचारधारा' (१९९३) या ग्रंथाच्या रूपात सादर करणे हीदेखील मराठी साहित्याच्या क्षेत्रातील एकमेवाद्वितीय घटना असावी.
 खांडेकरांच्या प्रस्तावना मराठी साहित्यात अनेक अर्थांनी लक्षणीय ठरल्या आहेत. एक तर खांडेकरांनी कथा, कादंबरी, निबंधसंग्रह, नाटक, कविता, संपादित ग्रंथ अशा विविध प्रकारच्या ग्रंथांना व इतरेजनांच्या पुस्तकांना लिहिल्या आहेत. त्यात मूळ कृतीचे सौंदर्य, वैशिष्ट्य, पार्श्वभूमी, लेखनामागची भूमिका विशद करण्याचा प्रयत्न असतो. खांडेकर पूर्वचिंतन करून नियोजनबद्ध पद्धतीने प्रस्तावना लिहितात. खांडेकरांची प्रस्तावना बहुधा विश्लेषणात्मक शैलीने लिहिलेली असते. त्यांच्या प्रस्तावना मूळ कृतींप्रमाणे लालित्यपूर्ण व जीवनलक्ष्यी असतात. चिंतनशीलता हे त्यांचे अंगभूत वैशिष्ट्य असते. त्यांचे स्वरूप निबंधसदृश असते. त्यांच्या प्रस्तावनांमुळे वाचकास मूळ कृती समजणे सोपे जाते. त्या कलात्मक असतात, तशा विचारगर्भही! खांडेकरांच्या प्रस्तावनेचं मराठी साहित्यात व्यवच्छेदक असं स्थान आहे. त्यांच्या प्रस्तावनांतून खांडेकरांचं शिक्षक, समाजचिंतक रूप प्रकट होतं. खांडेकरांच्या प्रस्तावना मूळ साहित्याइतक्याच दर्जेदार आहेत.
संपादक

 एखाद्या समकालीन अथवा पूर्वसूरी व्यक्ती अथवा व्यक्तींचे साहित्य प्रकाशनार्थ निवडून, ते सुधारून, संस्कारित करून, क्रम लावून आवृत्तीयोग्य ग्रंथ वा नियतकालिक तयार करणारा तो संपादक. वि. स. खांडेकरांनी शिरोड्यात ट्यूटोरिअल हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करताना वर्गाच्या

वि. स. खांडेकर चरित्र/५६