पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/61

हे पान प्रमाणित केलेले आहे.

१९२६ च्या नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेत ‘मराठी नाटक विषयावर नदीकाठी कोल्हटकरांच्या अध्यक्षतेखाली झालेले व्याख्यान त्यांचे पहिले जाहीर व्याख्यान हे होय. पुढे शिरोड्याच्या पंचक्रोशीशिवाय सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, म्हापसा, पणजी, मडगाव, पुणे, मुंबई सर्वत्र त्यांची भाषणे होत राहिली. लेखनाप्रमाणे सार्वजनिक भाषणही समाजमनाशी सुसंवाद साधण्याची एक प्रभावी साधना आहे, अशी खांडेकरांची धारणा होती. पूर्वी कीर्तनकार, प्रवचनकार प्रबोधनाचे कार्य करीत. ते कार्य वर्तमान युगात व्याख्याते करतात, असे ते मानत. खांडेकरांना परिस्थितीने वक्ता बनवले. सभा, समारंभ, संमेलने, व्याख्यानमाला, परिसंवाद, चर्चासत्रे यांतून त्यांच्यातील वक्ता आकारला.
 सन १९३४ ते १९५९ या कालखंडातील साहित्य, नाट्य, पत्रकार, ग्रंथकार इत्यादी संमेलनांत अध्यक्ष म्हणून केलेल्या व काही अपरिहार्य कारणांमुळे होऊ न शकलेल्या अशा विचारप्रवर्तक भाषणांचे तीन संग्रह प्रकाशित आहेत - ‘सहा भाषणे' (१९४१), ‘तीन संमेलने' (१९४७), ‘अभिषेक' (१९६१) याशिवाय सुमारे ४0 भाषणे असंग्रहित असल्याची नोंद ‘खांडेकर वाङ्मय सूची'त आहे. त्यानंतरच्या कालखंडातील महत्त्वपूर्ण भाषणे म्हणून उल्लेख करावा अशा भाषणांत ज्ञानपीठ पुरस्कार' (२६ फेब्रुवारी, १९७६), ललित पारितोषिक वितरण समारंभ' (१९६७), ‘साहित्य अकादमी महदत्तर सदस्यत्व प्रदान सोहळा' (१९७०), ‘डॉक्टर्स ऑफ लेटर्स' पदवी प्रदान सोहळा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (१९ मे, १९७६) यांचा उल्लेख करावा लागेल.
 वि. स. खांडेकर प्रभावी वक्ते होते. त्यांची भाषणे विचारगर्भ असत. त्यात श्रोत्यांशी संवाद साधण्याची विलक्षण शक्ती असायची. 'हे मी तुम्हाला सांगतो...' म्हणत ते आपले विचार श्रोत्यावर ठसवीत. काही बोलायचे म्हटले की, आधी उजव्या हाताने डावे मनगट चोळायचे. साधे पण कमी बोलायचे. भाषणे बहुधा आलंकारिक असत. जग,जीवन,संघर्ष, समाज, परिवर्तन, समता हे विषय भाषणात आपसूक असायचे. भाषणात कोट्या करायचे; पण स्वतः गंभीर असायचे. विषय कोणताही असला तरी त्याला समाजचिंतनाची डूब असायची.
पत्रलेखक

 ‘मनुष्य हा समाजशील प्राणी आहे', ही व्याख्या माणसाचे लक्षण अधोरेखित करीत असली तरी खरं तर समाजशीलता हे माणसाचं जीवनलक्ष्य असायला हवं, असं ती सूचित करते, असं मला वाटतं. ते वाटण्याला एक दृष्टान्त माझ्यासमोर आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/६०