पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/66

हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुसरीकडे प्रामाणिकता, शूचिता यांचं बंधन. या द्वंद्वात माणुसकीपेक्षा पैसा श्रेष्ठ ठरतो. गरिबास जीव अस्तित्व टिकविण्यासाठी शरीरविक्रयाचं पाप करावं लागतं, ते पवित्र नातं जपण्यासाठी; म्हणून खांडेकरांच्या 'छाया' बोलपटाच्या इंग्रजी विवरण पुस्तिका, जाहिराती इत्यादींमध्ये 'छाया'चा अनुवाद 'Holy Crime' असा करण्यात आला होता नि त्याच्यावर मोठं वादळ झाले होते. विविध वृत्त'नी भलावण केली होती, तर ‘मालव साहित्य'नी खरपूस समाचार घेतला होता. चित्रपटसृष्टीत 'छाया' बोलपटाचं संमिश्र स्वागत झालं तरी लौकिक अर्थाने हा बोलपट यशस्वीच म्हणायला हवा. या बोलपटास चित्रपटसृष्टीतील पहिले पारितोषिक म्हणून गणले गेलेले ‘गोहर सुवर्णपदक' लाभले. ते कलकत्ता प्रेस असोसिएशनकडून देण्यात आले होते. उत्कृष्ट कथाकथनासाठी मिळालेले हे पारितोषिक गोहर या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्रीचे स्मरण म्हणून त्या वेळी बहाल करण्यात आले होते. ते कन्यारत्न जन्मल्यावर बाळलेण्यासाठी खांडेकरांना नाइलाजाने मोडावे लागले होते.

 ‘छाया' हा मराठीतील पहिला शोकात्म सामाजिक बोलपट. तो कृष्णधवल होता. तो हिंदीतही ध्वनिमुद्रित (Dub) करून प्रकाशित करण्यात आला होता. ‘छाया'च्या हिंदी रूपांतरणाचे काम पंडित इंद्र यांनी केले होते. यातील दोन गाणी बा.भ.बोरकरांची होती. “अंधेरी नगरी' या हिंदी बोलपटाचा यावर प्रभाव होता. वि. स. खांडेकर यांनी आपल्या या कथेतून भावना व विचारांचे द्वंद्व, छाया व प्रकाश जोडीद्वारे व्यक्त केले होते. एका अर्थाने हा मेलोड्रामा होता. या चित्रपटाने 'हंस'च्या निर्मात्यांना मोठी उमेद दिली. स्वतः खांडेकर हा चित्रपट पाहून खुश झाले होते. या चित्रपटाच्या यशात वि. स. खांडेकरांच्या कथेचा जितका वाटा होता, तितकाच मास्टर विनायकांच्या दिग्दर्शनाचा होता. ‘विनायकांची वृत्ती व खांडेकरांची प्रकृती या दोहोंचा मेळ चांगला बसण्यासारखा होता. मास्टर विनायकांचे वि. स. खांडेकर हे श्रद्धास्थान होते; त्यामुळे त्यांच्या चित्रपटात मास्टर विनायकांची कला ऐन बहरात येत असे, याचे सुंदर प्रत्यंतर ‘छाया' पाहताना प्रेक्षकांना आले. ‘प्रेमिकांची जलाशयात मिसळणारी प्रतिबिंबे, दुःखदायक घटनेचे वृत्त देणारे वृत्तपत्र, कागदाचे बाहेर फेकलेले चिठोरे, वाऱ्याच्या झोताने पुन्हा खोलीतच पसरून जाण्यातील सूचकता, बदाम राणीवर किलवर गुलाम फेकून निर्माण केलेला छायाच्या जीवनातील विसंवादी सूर, शीलभ्रष्ट झालेल्या प्रसंगाची तीव्रता दाखविण्यासाठी मुसळधार पावसात दाखविलेला विजांचा कडकडाट या सर्व नव्या नाण्यांची (प्रतीकांची) टांकसाळ प्रथम

वि. स. खांडेकर चरित्र/६५