पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/87

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सन १९५३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचं दिग्दर्शन व्ही. एम. व्यास यांनी केलं होतं. यात मीनाकुमारी व भारतभूषण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शिवाय चित्रा, शशीकपूर, वास्ता, वीरा, राधाकिशन यांनीही या बोलपटात विविध भूमिका केल्या होत्या. मोहन ज्युनिअर यांचं या बोलपटास संगीत होतं. पुढे याच पटकथेवर आधारित 'अश्रू' कादंबरी खांडेकरांनी लिहिली. ती गाजली.
 ‘समस्येचे स्वरूप स्पष्ट करणे हे लेखकाचे काम. ती सोडविणे हे राजकीय पुरुषांचे आणि समाजशास्त्रज्ञांचे काम,' असे नाटककार इब्सेन म्हणत असे. त्या भूमिकेतून खांडेकरांनी या पटकथेत शंकर नावाच्या शाळा शिक्षकांच्या चरित्रातून मध्यमवर्गाच्या अनेक समस्या नि चारित्रिक गुणवैशिष्ट्यांची चर्चा केली आहे. शंकर हा तत्त्वनिष्ठ शिक्षक, आर्थिक विवंचनेत असूनही प्रलोभनांना बळी न पडता मूल्यरक्षण, आदर्श यांची पूजा बांधत जीवनभर संघर्ष करीत राहतो. मध्यमवर्गापुढे आर्थिक व सांस्कृतिक समस्यांचा संघर्ष सतत पिंगा घालीत असतो. या मूल्यांची शकले परस्परविरुद्ध फेकली गेल्याने हा वर्ग समाजाच्या दृष्टीने निष्प्रभ ठरतो. 'स्व' की 'पर'हित या द्वंद्वात नेहमीच या वर्गावर परहिताची मोहिनी राहिली व तीच त्याच्या शोकांतिकेस कारणीभूत होत राहते. याची मांडणी खांडेकरांनी आपल्या पठडीत राहून केली आहे. जगात मूल्य, संस्कृती, संस्कार यांचे स्थायित्व शंकरसारख्या सामान्य माणसाच्या ‘पावलापुरता प्रकाश' या आचारधर्मावरच टिकून आहे. कालौघात समाजात बदल होतात; पण मूल्ये अटळ राहतात, ती शंकरसारखी सामान्य माणसं प्रत्येक काळात संघर्षाच्या झंझावातातही मूल्यास चिकटून राहतात म्हणून. ही पटकथा बोधप्रद असून आदर्शवादी आहे.

तेलुगू व तमिळ चित्रपट
‘धर्मपत्नी'

 वि. स. खांडेकर हे विविध भारतीय भाषांत भाषांतरित झालेले ‘आंतरभारती लेखक' होते. हा बहुमान फारच थोड्या मराठी भाषी साहित्यिकांना लाभला. जे साहित्याचं, तेच चित्रपट क्षेत्राचंही. मराठी, हिंदीबरोबरच तेलुगू व तमिळ भाषांत चित्रपटासाठी कथा देणारे खांडेकर हे बहुधा एकमेव मराठी कथाकार असावेत. त्यांच्या बहुतांशी साहित्याचा का. श्री. श्रीनिवासाचार्य यांनी तमिळ भाषेत अनुवाद केल्याने खांडेकर तमिळ वाचकांना चांगलेच परिचयाचे होते. ते लक्षात घेऊन हा चित्रपट मुळात तेलुगूमध्ये असला तरी तमिळमध्ये डब करण्यात आला होता.

वि. स. खांडेकर चरित्र/८६