पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/99

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पाशवी शक्तीच्या प्रदर्शनातच त्याच्या अहंकाराचे समाधान होते. खांडेकरांच्या चिंतनात कालजयी वृत्ती असते. ते सर्व काळात लागू होतं. इथे नुसतं ‘निषाद'च्या जागी ‘कसाब' शब्द घालून वाचा म्हणजे ते वर्तमानाचं चित्र होऊन जाईल. (बाणाच्या जागी बंदूक ओघानं येईलच!)
सामाजिक भावना
 माणूस जगतो कशावर? अन्नावर की आशेवर? याचं उत्तर ज्याच्या त्याच्या मगदुरानुसार भिन्न असलं तरी हे खरं आहे, की उदरभरण म्हणजे जीवन नव्हे! जीवन ही त्यापलीकडची गोष्ट आहे. जीवनात भावनेची जोड असते, म्हणून माणसाचं जगणं सुसह्य होतं. मनुष्य स्वतःपलीकडे पाह लागतो तो सामाजिक जाणीव झाल्यावर. ही जाणीव त्याला काव्य, अश्रू आणि भावनेतून मिळत असते. ती कधी शब्दांतून तर कधी कृतीतून उमजते, हे खांडेकर ‘क्रौंचवध'मध्ये ज्या ताकदीने स्पष्ट करतात त्यातून त्यांच्या शब्दांचे सामर्थ्य आणि साधुत्व स्पष्ट होतं. ते म्हणतात, ‘सामाजिक भावना हा विकासशील मानवी जीवनाचा आत्मा आहे. ही भावना नेहमी तीन प्रकारांनी प्रगट होते, शब्दांनी, अश्रूनी आणि कृतींनी. काव्य हे या भावनेचे पहिले सुंदर रूप; पण काव्यातील शब्द कितीही सुंदर असले तरी शेवटी ते वाऱ्यावरच विरून जातात. अश्रू हे या भावनेचं दुसरं रमणीय रूप! पण माणसाच्या क्षुब्ध हृदयसागरातून बाहेर येणारे हे मोती शेवटी मातीमोलच ठरतात! डोळ्यांतील पाण्याने मनुष्य स्वतःतील हृदयातील आगसुद्धा शांत करू शकत नाही, मग जगातील वणवा तो काय विझवणार? सभोवताचे दुःख पाहून व्याकुळ झालेले माणसाचं मन हलके करण्यापलीकडे शब्द आणि अश्रू यांच्यात सामर्थ्य असत नाही.
 या भावनेचे तिसरे स्वरूपच मानवी प्रगतीला उपकारक होऊ शकते. या स्वरूपात ती तोंडाने किंवा डोळ्याने बोलत नाही. ती नेहमी हातानेच बोलते. स्वतःचे रक्त शिंपून ती इतरांचे जीवन फुलविते.
 ‘शब्द, अश्रू आणि रक्त! तिघांच्या उगमाचे स्थान एकच; पण त्यांची जगे किती भिन्न?
माणूस, मूल्य आणि संस्कृती

 वि. स. खांडेकरांच्या साहित्याचे सार आणि ध्येय तीन शब्दांत सांगायचे तर वरील तीन शब्दांशिवाय चौथा शब्द सांगता येणार नाही. माणूस आणि मूल्य यांचा संघर्ष सनातन असल्याने त्याचे चित्रण खांडेकरांनी अनेक परींनी केले आहे. संस्कृती फक्त मनुष्याचीच असते आणि तिचे अधिष्ठान असते मूल्य! मूल्यांशी प्रतारणा माणसात निर्माण केली ती कांचनमृगाच्या हव्यासाने.

वि. स. खांडेकर चरित्र/९८