पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/177

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुले शाळेतच दोन दिवस राहात. तंबू ठोकले जायचे. साहस, स्वावलंबन, सहजीवन शिकवण्यावर भर असायचा. सहल असायची. संगीत कवायत शिकवली जायची. कोबायाशींनी संगीत कवायत जपानभर पसरवली. आज ती जागतिक झाली. ऑलिंपिक्स, एशियाड, आयपीएल, विश्वकप (फुटबॉल) इत्यादीची उद्घाटने, समारोप म्हणजे संगीत कवायतीचे शानदार प्रदर्शन असते. प्रेक्षकांची रंगसंगती, रंग संगतीतून ध्वज, चिन्ह, नकाशे, आकारांची निर्मिती त्याचे जनक कोबायाशीच. कोबायाशी चांगले कवीपण होते.

 या साऱ्या आठवणीतून तोत्तोचाननी आपली शाळा व शिक्षक अमर केले. तिने लिहिलेले ‘तोत्तोचान' पुस्तक म्हणजे शाळेने जपलेल्या तिच्या निरागसपणाची जपणूक आणि विकास. ज्या शाळा हे जपतात, त्यांची मुले जगप्रसिद्ध होतात तोत्तोचानसारखी. हे पुस्तक जगातल्या अनेक भाषांत गेले. युनिसेफ या जागतिक बालक संस्थेने तिला आपला शिक्षण राजदूत बनवले. तिने जगभर मुलांचे निरागस बालपण जपण्यासाठी अनेक भाषणे, मुलाखती दिल्या. लेख लिहिले. पुस्तके लिहिली. यातून तोत्तोचाननी मुलांकडे पहाण्याची नवी खिडकी जगाला दाखवली. खिडकीजवळ बसणारी ही चिमुरडी. तिने शिक्षणाची नवी खिडकी उघडली. तुम्ही तुमच्या शाळा, शिक्षकांच्या आठवणी लिहा. प्रकाशित करा. कदाचित तुम्हीपण उद्या जगाचे राजदूत बनाल,


• तोत्तोचान लेखक - तेत्सुको कोरायानागी

 अनुवाद - चेतना सरदेशमुख गोसुवी
 प्रकाशक - नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली

 प्रकाशन वर्ष - १९९८
 पृष्ठे - १३0 किंमत - ५0 रु.

♦♦

वेचलेली फुले/१७६