पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/76

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असले तरी या कविता विलक्षण व्यक्तिवादी होत. परिसराची प्रतिक्रिया म्हणून जन्मलेल्या या कविता कवींचे जीवन चिंतन प्रतिबिंबित करतात. संग्रह शीर्षक कविता महानगराची गती नि गत चित्रित करते. राजधानीतील वसंत जीवनात मात्र ग्रीष्मच निर्माण करतो. 'पंचतारा जीवन'मध्ये कवी ‘गड्या आपुला गाव बरा'चा भाव निर्माण करतो. कवी राजनीतिज्ञ म्हणून बैठकीतून स्वैर संचार करतो खरा, पण त्याचे मन मात्र भटकत राहते. मन हरवलेल्या ‘प्रिय'च्या शोधात... फुजीसानचे सौंदर्य, बर्फाच्छादित शिखरे त्याला भुरळ नाही घालत... ही असते माती नि नाती. इत्यादीपासून झरणारी ऊब, आत्मीयता...

 ‘अंधेरा अच्छा लगता है, मुख्यमंत्री आ गये' सारख्या या संग्रहातील रचना गंभीर व्यंग रचना होत. कवीची जाण, प्रौढपण, देशप्रेम समज व्यक्त करणाऱ्या या रचना...
 ‘जिनका काम है प्रकाश दिखलाना
  वही लगे अंधेरा बाँटने
 सारख्या काव्यपंक्ती पुरेशा बोलक्या होत.
 कॉरिडॉर के गांधी बाबाने बंद कर ली है अपनी आँखें
 प्रकाश का अर्थ उन्होंने पाया है...
 मेरे फटे झोले से...
 म्हणणाऱ्या कवीस परिस्थितीच्या पतनाचे पुरेसे भान नि ध्यान असल्याचेच या ओळी स्पष्ट करतात. मुख्यमंत्री जपानला येतात. तिथले वैभव, यंत्रवत जीवन, स्वच्छता पाहून प्रभावित होतात. अधिका-यांना हुकूम सोडतात. ‘आपल्या गावी असे करा' अधिकारी माना डोलावतात. त्यांच्या मनात मूलभूत प्रश्न असतो.
 हाँ जी, हाँ जी सर, सब कुछ बनायेंगे
 पानी की चिंता है, वो कहाँ से लायेंगे?
  हा छोटासा प्रश्न स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांचा हिशेब पुरता करतो.

 ‘अर्जी में लिखा है' कविता कलात्मक, उपमा नि व्यंगांचे अद्वैत या कवितेत चपखल प्रतिबिंबित झाले आहे. चुंबन की राजमुद्रा' शरीरी प्रेमाची कविता. पण तिला कवीने भावनेची चांगली डूब दिली आहे. या संग्रहातील अनेक कवितांत कवीचे मन विमान, पक्षी होऊन सतत हरवलेले आकाश शोधत असल्याचे जाणवते. ‘विमान... मेरा मन' कवितेच्या शीर्षकानेही ते पुरेसे लक्षात येते. 'विमान... आसमान में कविताही याच पठडीतली. ‘अस्पताल...बेलगाम' या संग्रहातील वेगळी कविता, मरण प्रतिबिंबित करणारी. निसर्ग व नियतीचे नाते जोडणारी.

वेचलेली फुले/७५