या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. __परंतु या चित्रा अथवा फल्गुनीपूर्णमासांला वर्षारंभाचे दिवस मानण्याचे कारण काय ? सायणाचार्यांच्या मताप्रमाणे पहातां हे दिवस वसंतामध्ये येतात म्हणून त्यांस वर्षारंभ म्हटले. परंतु तैत्तिरीयसंहितेच्या काळी चैत्र वैशाख हे वसंतऋतूचे महिने होते; फाल्गुन चैत्र हे नव्हते. ही अडचण दूर करण्याकरितां सायणाचार्यांनी दुहेरी वसंताची कल्पना केली. एक चांद्र व दुसरा सौर. चांद्रवसंतामध्ये फाल्गुनचैत्र घातले व सौरामध्ये चैत्रवैशाख घातले. परंतु असें करण्याची काही आवश्यकता नाही. शिवाय चांद्रऋतूंचा कायमपणा नाही. कारण चांद्र वर्ष सौर वर्षाशी जमवून घेण्यासाठी अवश्य तेव्हां एक अधिक महिना धरीत असत. अर्थात् चांद्र महिन्यांचा व ऋतूंचा मेळ फार वेळ रहात नसे. परंतु सायणाचार्य म्हणतात त्याप्रमाणे दुहेरी ऋतु धरले तरी फाल्गुन वसंतामध्ये येऊ शकत नाही. सौर वर्षापेक्षा चांद्र वर्ष सुमारे अकरा दिवसांनी कमी असल्यामुळे व ऋतू सूर्यावर अवलंबून असल्यामुळे एकदां चैत्र शुद्ध प्रतिपदेस वसंतारंभ झाल्यास पुढच्या वर्षी चैत्र शुद्ध द्वादशीस होईल; असे होता होतां तिसऱ्या वर्षां अधिक. मास धरल्यावर पुन्हा तो चैत्रांत पूर्वस्थळी येईल. अशा रीतीने दुहेरी ऋतु धरल्यास वसंतारंभ पुढे वैशाखापर्यंत जाईल. परंतु फाल्गुनामध्ये मागे येणे शक्य नाही. सायणाचार्याच्या वेळी म्हणजे

  • त्या वेळी वसंतसंपात कृत्तिकामध्ये होता, म्हणजे वसंत ऋतूला वैशाखांत सुरुवात होत असे म्हणून वास्तविक पाहिले असतां वैशाख ज्येष्ठ हे वसंत ऋतूचे महिने होते.