या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ वेदकालनिर्णय. लॅटीन व्हीनस ही प्रीतीची देवता आहे. संस्कृत वेन शब्दही प्रीति करणे या अर्थाच्या वेन् धातूपासूनच निघाला आहे. शिवाय यज्ञामध्ये शुक्रपात्र घेतानांच या वेनाच्या सूक्ताचा उपयोग करावयाचा असतो. या गोष्टी लक्षात आणतां, वैदिक वेन व लॅटीन व्हीनस ही एकच असली पाहिजेत असे दिसते. आतां या शब्दांची लिंगे एकच नाहीत. लॅटीन् व्हीनस् स्त्रीलिंगी आहे. परंतु हा लिंगभेद मोठासा महत्वाचा नाही. यूरोपमध्ये जातांना चंद्राचाही असाच लिंगविपर्यय झाला आहे. शुक्र वेदकाळी माहीत होता या गोष्टीला दुसरा आधार ग्रीक भाषेतील कुप्रिस् हा शब्द आहे. हा शब्दही शुक्रग्रहवाचकच आहे. स्वरशास्त्राच्या (phonetics) नियमाप्रमाणे संस्कृत शुक्र शब्दाचें ग्रीक रूप कुप्रॉस् असे होईल. पण यूरोपमध्ये जातांना या ग्रहाचा लिंगविपर्यय झाल्यामुळे कुप्रॉस् याचे कुप्रिस असे स्त्रीलिंगी रूप झालें. अशा रीतीने या ग्रहाच्या लॅटिन व ग्रीक भाषेतील अनुक्रमें व्हीनस व कुप्रिस् या नांवाची परंपरा वैदिक वेन व शुक्र या शब्दांशी लावता येते. यावरून असे दिसते की हे तीन प्रकारचे लोक एकत्र असतांनाच शुक्राची माहिती होऊन त्याचे नामकरणही झाले होते. या वरील विवेचनांतील काही गोष्टी जरी संशयित असल्या तरी त्यावरूनही वैदिक ऋषींना ज्योतिषांतील ढोबळ गोष्टी तरी निदान माहीत होत्या एवढे उघड होते. चंद्रसूर्यांच्या वार्षिक गतीवरून होणारे कालविभाग त्यांनी ठरविले होते. सौरवर्षाचे मानही त्यांनी निश्चित केले होते; व चांद्रवर्षाचा त्याशी मेळ