पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९५
मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य

त्यात कामगार किंवा त्या वर्गातून आलेला असा एकही नव्हता. असे असूनही कम्युनिस्ट क्रांतीचे नेतृत्व कामगारच करू शकतील, इतरांना ते शक्य नाही हा आपला हेका सोडण्यास लेनिन तयार नाही. कारण त्या त्या वर्गाचे गुण मार्क्सने ठरवून दिलेले आहेत! तसे वेदवचन आहे.
 कामगारांप्रमाणेच बुद्धिजीवी वर्गाचे गुणही मार्क्सवादाने सांगून टाकले आहेत. नेतृत्व त्यांनाच शक्य आहे इत्यादि सिद्धान्त सांगूनही हा वर्ग नेहमी भांडवलाचा दास असणार, तो क्रांतिविरोधी, प्रतिगामी वृत्तीचाच असणार, तो कामगार- क्रांतीला दगा देणार हे कम्युनिस्टांचे तत्त्वज्ञान अबाधितच आहे ! जातींच्या बाबतीत बोलताना ज्याप्रमाणे 'त्याचा जातगुणच तो' असे म्हणतात त्याचप्रमाणे त्याचा वर्गगुणच तो असे मार्क्सवादात म्हणण्याची चाल आहे. बुद्धिजीवी वर्गच नेतृत्व करू शकेल, कामगारांना ते शक्य नाही असे एके ठिकाणी म्हणून रशियातील बुद्धिजीवी वर्गाने कामगारांना दगा देऊन भांडवलाचे दास्य पत्करले असेही लेनिनने म्हटले आहे. आणि येथेच न थांवता हा त्याचा वर्गगुणच आहे असेही त्याने म्हटले आहे; (३.४१३). या संबंधात लेनिनने इतकी परस्परविरुद्ध व विसंगत विधाने केली आहेत की शास्त्रवचन व प्रत्यक्ष व्यवहार यांचा समन्वय करताना जुन्या सनातन शास्त्रीबुवांनी सुद्धा इतकी केली नसतील (पहा ३ पृ. ११५, १२६, ४१३). अमक्या वर्गाचे अमके गुण, तमक्याचे तमके असा मार्क्सप्रणीत भ्रामक सिद्धान्त अंधश्रद्धेने स्वीकारल्यानंतर दुसरे काय होणार ? जन्मावर माणसाचे गुण अवलंबून असतात हा सिद्धान्त जुन्यांनी केला होता, तर आर्थिक स्थितीवर ते अवलंबून असतात असा नवब्रुवांनी केला आहे. दोघेही सारखेच अंध, सारखेच अविवेकी !
 रशियात १७ साली क्रांती झाली. त्यानंतर नवरचना करावयाची होती. त्यासाठी शास्त्रज्ञ, इंजिनीयर, डॉक्टर, तत्त्वज्ञ, पंडित यांची आवश्यकता होती. त्यांच्यावाचून जीवनाची पुनर्घटना करणे अशक्य आहे, हे लेनिनने कामगारांना स्पष्ट बजावले आहे. आता हे बुद्धिजीवी भांडवलाचे दास असल्यामुळे त्यांना विश्वासार्ह कसे मानावे, असा कामगारांपुढे- खरे म्हणजे कामगारांच्या बुद्धिजीवी नेत्यांपुढे- प्रश्न होता. त्या वेळी लेनिन म्हणाला की "आपले कार्य पाहून हे विद्यावंत लोक हळूहळू आपल्याकडे आकृष्ट होत आहेत. आणि काही दिवसांनी ते आपल्याशी समरस होतील. आपलेच होतील" (४.४४८). आता