पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०३
मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य

तो जिंदगीपासून जसा मुक्त तसाच व त्यामुळेच असल्या सर्व प्रकारच्या निष्ठापासूनही मुक्त असतो.
 पण मार्क्सच्या दुर्दैवाने कामगारांनी त्याचे हेही सिद्धान्त उधळून लावले. भांडवलदार, जमीनदार, शेतकरी यांच्या इतक्याच तीव्रपणे या निष्ठा आपल्याठायी आहेत हे त्यांनी पदोपदी दाखवून दिले. कामगार हा स्फूर्तीसाठी पूर्वेतिहासाकडे कधी पहात नाही; त्याची नजर नेहमी भविष्यकाळाकडे असते असे एक मार्क्सवचन आहे. पण त्याच्याच तत्त्वज्ञानाने प्रेरित झालेल्या सोव्हिएट रशियातील कामगारांना दुसऱ्या महायुद्धात जर्मनीशी लढण्याची स्फूर्ती यावी म्हणून स्टॅलिन हा सारखी कुटुसाफ, नेव्हस्की, पीटर इत्यादि पूर्वजांच्या पराक्रमाची गाणी गात होता. मार्क्सचे वर्गकलहाचे, कामगारजीवनाचे, कम्युनिझमचे तत्त्वज्ञान त्यांना युद्धप्रेरणा देण्यास सर्वस्वी असमर्थ ठरले. आंतरराष्ट्रीय दृष्टि हे कामगारांचे पहिले लक्षण. ते औषधालाही या युद्धात दिसले नाही. रशियन राष्ट्राच्या कडव्या अभिमानानेच ते लढत होते आणि सोव्हियेट नेते तोच अभिमान चेतवीत होते. मार्क्सच्या वचनांनी अंकित असलेले ध्वज या वेळी फेकून देण्यात आले होते. आणि रशियन राष्ट्राभिमान चेतविणारी, जर्मनीचा द्वेष भडकवणारी वचने असलेले ध्वज उभारण्यात आले होते. त्या युद्धात मार्क्स एंगल्स यांचे अत्यंत प्रिय असे जर्मन कामगार हे राष्ट्रनिष्ठा व आर्यरक्तनिष्ठा यांनी प्रेरित, नव्हे पिसाट झाले होते. रशियन कामगार आपले बंधू आहेत आणि जर्मनीचे सत्ताधारी हे खरे आपले शत्रू आहेत हा मार्क्सविचार त्यांनी रशियन कामगारांच्या रक्तांत बुडवून टाकला. आणि मार्क्सच्या तत्त्वज्ञानांत मुरत ठेवलेल्या रशियन कामगारांनीही तेच केले. नव्या भावी कम्युनिस्ट- साम्यवादी समाजरचनेचे भव्य दर्शन ही निष्ठा, त्यांना प्रेरणा देती झाली नाही, राष्ट्रवादापेक्षा ती निष्ठा श्रेष्ठ ठरू शकली नाही. अत्यंत गर्ह्य, त्याज्य, निषिद्ध अशा जर्मन-द्वेषाचाच त्यांना आश्रय करावा लागला.
 वर्णद्वेष, धर्मद्वेष यांची हीच कथा आहे. कोणच्याही देशातले कामगार यातून मुक्त आहेत असे दिसत नाही. अमेरिकन कामगार इतर अमेरिकनां- प्रमाणेच तेथील निग्रोचा द्वेष करतात. शाळा, उपहारगृहे, वाहने यांत त्यांना बरोबरीने अमेरिकन सत्ताधारी बसू देत नाहीत म्हणून तेथील काम-