पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
वैयक्तिक व सामाजिक

गारांनी कधीही त्यांचा पक्ष घेतला नाही. इतकेच नव्हेतर त्यांचा छळ करण्यात तेही हौसेने भाग घेतात. ब्रिटनमध्येही तेच आहे. एका हिंदी माणसाला बस- कंडक्टर म्हणून नेमतांच बाकीच्या ब्रिटिश कामगारांनी संप केला. संप हे कामगारांचे मोठे अस्त्र. त्याचा त्यांनी दुसऱ्या कामगाराची भाकरी तोडण्यासाठी उपयोग केला ! विश्वाचे कल्याण हे जे त्यांचे मार्क्सप्रणीत ध्येय त्यासाठी नाही ! जर्मन कामगार इतर जर्मन लोकांबरोबर ज्यू-द्वेषाने अंध झाले होते ही कथा काही जुनी नाही. सर्व जगाच्या शरीरावर त्याच्या खुणा अजून आहेत. आणि मार्क्सची स्मृती कदाचित् नष्ट होईल, पण यांची होणार नाही.
 धर्मनिष्ठा, धर्मांधता, असहिष्णुता, परधर्मद्वेष यांतून कामगार मुक्त आहेत काय ? हिंदुस्थानात पाकिस्तानची चळवळ चालू होती. अंध धर्मश्रद्धा हाच तिचा पाया होता. मुंबई, कलकत्ता, अहमदाबाद, कानपूर इत्यादि शहरांतल्या कामगारांना त्यांच्या कम्युनिस्ट नेत्यांनी कित्येक वर्षे मार्क्सवाद शिकवला होता. आंतरराष्ट्रीय दृष्टी दिली होती. धर्माच्या अफूपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण मुस्लिम कामगारांनी पाकिस्तानला विरोध केला काय ? ते हिंदुधर्माच्या, भारतराष्ट्राच्या द्वेषापासून अलिप्त राहिले काय ? आणि आजही ती प्रगती झाली आहे काय ? क्षुल्लक कारणावरून अजूनही भारतात दंगे पेटतात. मुस्लिम कामगार त्यांचा निषेध करीत नाहीत. त्यांचा सगळा ओढा अन्यत्र आहे. उलट काश्मीरमध्ये मुस्लिम किसान आहेत. त्यांनी भारतात सामील होण्याचा अट्टाहास धरला आणि त्या वावतीत आपल्या सरकारला सक्रिय पाठिंबा दिला. कामगारांपेक्षा ते किसानच ज्यास्त क्रांतिकारक ठरले. रशियन कामगारांनीही आपली धर्मश्रद्धा मार्क्सवादाच्या डोहात अर्धशतक उभे राहिल्यानंतर पहिल्याइतकीच उज्ज्वल आहे, हे दाखवून दिले आहे. धर्मप्रचार करणे हा प्रारंभी सोव्हियेट सरकारने गुन्हा ठरविला होता पण अटीतटीचे प्रसंग येताच ते कायदे ढिले करावे लागले. आणि लोकांना लढण्यास स्फूर्ती यावी म्हणून सोव्हियेट सरकारला त्यांच्या धर्मभावनेला आवाहन करावे लागले. मार्क्सवाद हा शिळोप्याच्या वेळी उपयोगी पडतो. निकराचे प्रसंग आले की कामगार त्याला मूठमाती देतात असा इतिहास आहे.
 कामगार क्रांती करतात ती केवळ स्वतःसाठी नसून सर्व समाजासाठी