पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११३
मार्क्सचे भविष्यपुराण

थांबत नाही; तर धर्मव्यवस्था, कायदा, विद्या, विवाहसंस्था, स्त्रीपुरुषसंबंध, परमार्थविषयक मते, प्रवृत्ती, निवृत्ती म्हणजे एकंदर मानवी संस्कृतीच या अर्थोत्पादन-साधनामुळे निश्चित होत असते असे मार्क्सचे मत आहे, आणि त्यातूनच त्याचे भविप्यज्ञान निर्माण होत असल्यामुळे हा सिद्धान्त काय आहे ते जरा तपशिलाने पाहू.
 पूर्वी लढाईत जिंकलेल्या माणसांची सर्रहा कत्तल करीत असत. पुढे दया- धर्माचा उदय झाला. कोणातरी धर्मवेत्त्याने मानवाला, सेनापतीला, राजांना दया हा श्रेष्ठ धर्म आहे, मनुष्याची हिंसा करू नये असा उपदेश केला आणि म्हणून या कत्तली थांबल्या असे आपल्याला वाटते. पण मार्क्सवादी म्हणतात, तसे नाही. जिंकलेल्या लोकांना गुलाम करून त्यांना शेतीला वा इतर अन्य कामाला लावून त्यांच्यापासून धनोत्पादन करून घेण्याची व्यवस्था होत नव्हती तोपर्यंत जेते लोक जितांची कत्तल करीत. पुढे शेतीला माणूसबळ हवेसे झाले तेव्हा कत्तली थांबल्या. त्या वेळी दयाधर्माचा उपदेश, अहिंसेचा उपदेश, एखाद्या बुद्धाने केला असेल. पण त्या दयाधर्माचे याच वेळी स्फुरण झाले ते शेतीला कष्टकरी माणसांची आवश्यकता निर्माण झाली म्हणूनच. उत्पादनसाधनांत बदल झाला म्हणून दयेचे तत्त्व उदयास आले, व त्यामुळेच बुद्धाचा जन्म झाला. पुरुष हे एकापेक्षा जास्त बायका करू लागले त्याचेही कारण असेच आहे. त्यांची कामवासना हे कारण नव्हे. शेतीला हुकमी मनुष्यबळाची आवश्यकता भासू लागली की मग लोकांना अनेक लग्ने करण्याची बुद्धी होते. तोपर्यंत होत नाही. आणि झाली तरी तशी प्रथा यशस्वी होणार नाही. समुद्रगुप्त, हर्ष यांसारखे राजे इतर राजांची लहानलहान राज्ये नष्ट करून तेथे एकछत्री साम्राज्य स्थापतात. यापाठीमागे त्यांची साम्राज्यलालसा आहे, असे आपण म्हणू. पण ही मीमांसा मार्क्समते योग्य नाही. लहान लहान राज्ये असली की ते राजे आपसात सारखे लढत राहतात. कृषि, वाणिज्य इत्यादि व्यवसायांची हानी होते. मग त्यांची भरभराट व्हावी येवढ्यांसाठी एकछत्री राज्याची आवश्यकता निर्माण होते. मग कोणीतरी समुद्रगुप्त निर्माण होतोच. आणि उत्पादनसाधनांची भरभराट व्हावी अशी परिस्थिती म्हणजे एकछत्री साम्राज्य निर्माण करतो. संन्यास, प्रवृत्ती, निवृत्ती, व्यक्तिस्वातंत्र्य, एकपत्नी, बहुपत्नी ही सर्व तत्त्वे अशीच अर्थोत्पादन- साधनांवर अवलंबून
 वै. सा. ८