पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

हे पाहण्यात, या दुर्दैवाची कारणमीमांसा करण्यात, त्यातून भविष्यकाळासाठी काही ऐतिहासिक सत्ये शोधून काढण्यात. तेच आता करावयाचे आहे.
 ही कारणमीमांसा एका वाक्यात सांगावयाची तर असे म्हणता येईल की या काळात हिंदूंच्या धर्मसंस्थेला अत्यंत अवकळा आली होती. हा धर्म अगदी हीन पातळीला आला होता. या धर्माला पराकाष्ठेची ग्लानी आली होती. 'धारणाद्धर्म इत्याहु: धर्मो धारयते प्रजाः ।' या वचनातील धर्म शब्दाचा अर्थ येथे अभिप्रेत आहे. समाजाचे धारण-पोषण करणे, त्याच्या योगक्षेमाची चिंता वाहणे, त्याला सामर्थ्य, समृद्धी, वैभव प्राप्त करून देणें, त्याला आत्मरक्षणाला व पराक्रमाला समर्थ करणे, हे धर्माचे कार्य आहे. नागरिकांच्या मनात थोर आकांक्षा, विजिगीषा जागृत करून त्यांना स्फूर्ती देणें, प्रेरणा देणें हे धर्माचे कार्य आहे. हिंदुधर्माला या काळात इतके हीन रूप प्राप्त झाले होते की, तो यातले काहीहि करू शकत नव्हता. उलट पराक्रम महत्त्वाकांक्षा, विजिगीषा यांची हत्या करतील अशीच तत्त्वे या धर्माने उराशी कवटाळली होती. इतिहास वरवर चाळला तरी कोणालाही हे स्पष्ट दिसेल की, मुसलमानांनी जो पराक्रम केला, आक्रमणे केली, राज्ये स्थापिली, येथे विध्वंस केला, कत्तली केल्या, हिंदूंना जुलमाने वाटविले, त्यांची मंदिरे लुटली, जाळली, विद्यापीठे धुळीला मिळविली, येथे जे जे केले त्याच्या मागे त्यांच्या धर्माची प्रेरणा होती. इस्लामी सुलतान आक्रमण करून येत ते लूट करण्यासाठी, राज्यासाठी, वैभवासाठी येत हे खरे. पण स्वधर्माचा प्रसार करावा हाही तितकाच प्रबळ हेतु त्यांच्या मनात असे आणि या भावनेने प्रत्येक मुसलमान शिपाई चेतलेला असे. म्हणजे प्रत्यक्षांत दिसणारी, प्रत्यक्ष हातात येणारी धनधान्य- स्त्रिया यांची लूट आणि धर्मकार्य, धर्मसेवा या दोन प्रेरणा एकत्र झाल्या आणि त्यातून एक महाभयंकर संहार- सामर्थ्य इस्लामी- यांच्या ठायी निर्माण झाले. काफरांच्या कत्तली, मंदिर, विध्वंस, त्यांच्या धर्मग्रंथाची, घरादारांची जाळपोळ हे धर्मकृत्य आहे, अशीच सर्व सुलतानांची व शिपायांची श्रद्धा होती. म्हणजे मुसलमानांच्या या कृत्यामागे वासनांची तृप्ती आणि ध्येयाची पूर्ती या प्रेरकशक्ती उभ्या असत. हा संयोग फार भयंकर आहे. यामुळे माणसे पिसाट होतात, त्यांच्या अंगात संचार होतो आणि या धुंदीतून, बेहोषीतून जी विध्वंसशक्ती निर्माण होते तिला तोंड देणें अशक्य-
 वै. सा. ...५