पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
वैयक्तिक व सामाजिक

प्राय होऊन वसते. आरब, तुर्क, मोगल, अफगाण हे येथे आले ते असले वादळी, झंझावाती, तुफान सामर्थ्य घेऊन आले. त्यांच्यापुढे उभे राहणारे जे हिंदू त्यांच्या ठायी हे धुंद सामर्थ्य, ही पिसाटशक्ती याच्या सहस्रांशाइतकीसुद्धा नव्हती! असे का ? असली शक्ती निर्माण करण्याचा हिंदुधर्माने प्रयत्न केला नव्हता. इतकेच नव्हे तर वैभव, समृद्धी, पराक्रम यांसाठी अवश्य असणाऱ्या सर्व प्रेरणांची अगदी टिपण घेऊन हत्या करण्याचा विक्रम मात्र अनेक शतके हदूंनी चालविला होता. हिंदूंच्या वर सांगितलेल्या, लांच्छनास्पद अपयशाची सर्व कारणे या धर्मनाशात आहेत, धर्मग्लानीत आहेत.
 इस्लामी धर्म आक्रमण, साम्राज्य, विश्वसंचार, जगज्जेतृत्व, शत्रूंचा संहार, यांची प्रेरणा देत होता, तर हिंदुधर्म या काळात मायावाद, निवृत्ती, संसाराचे क्षणभंगुरत्व यांचा उपदेश करून मनुष्याच्या मनातल्या या आकांक्षा समूळ नष्ट करण्याचा कसून प्रयत्न करीत होता. 'गीतारहस्या'च्या पहिल्या प्रकरणात लो. टिळकांनी या प्रयत्नाचा इतिहास दिला आहे. गीता हा हिंदुधर्माचा महाग्रंथ. त्याचा अर्थ श्रीशंकराचार्यांच्या पूर्वीच्या काळी भाष्यकारांनी महाभारतकारांप्रमाणे ज्ञानकर्मसमुच्चयात्मक म्हणजे ज्ञानाबरोबरच ज्ञानी मनुष्याने आमरणान्त स्वधर्मोक्त कर्म केले पाहिजे- असा प्रवृत्तिपर लावला होता, असे टिळक सांगतात. श्रीशंकराचार्यांपासून मात्र प्रकरण उलटले आणि तेथून पुढे श्रीरामानुजाचार्य (इ. स. १०१६), श्रीमध्वाचार्य (११९८), श्रीवल्लभाचार्य (१४७९), निंबार्क (११६२) या आचार्यांनी, एकजात सर्वांनी गीतेचा अर्थ केवळ निवृत्तिपर, आणि संन्यासपर लावला. त्यांच्यात जगाच्या मूलकारणाविषयी व मोक्षमार्गाविषयी मतभेद होते. पण निवृत्तिविषयी, संन्यासमार्गाच्या श्रेष्ठतेविषयी, संसार, राज्य, साम्राज्य, ऐहिक वैभव यांच्या क्षणभंगुरत्वाविषयी त्यांच्यात मतभेद नव्हता. त्यांनी केवळ गीतेचाच नव्हे, तर उपनिषदे, ब्रह्मसूत्रे यांचाहि अर्थ तसाच लावला आणि त्याच धर्माचा उपदेश करून हिंदूंना धन, वैभव, समृद्धी, स्वराज्य, भौज्य, वैराज्य, साम्राज्य यांची इतकेच नव्हे तर वैयक्तिक संसारातील स्त्रीपुत्रादिकांच्या उत्कर्षाची सुद्धा, अणुमात्र इच्छा राहूं नये असा अट्टाहास चालविला. गीता हा हिंदुधर्माचा प्राण आहे. जनमनावर त्याचे किती वर्चस्व आहे हे भारतीयांना सांगावयास नको. त्यातूनच भाष्यकारांनी हे कश्मल, अनार्यजुष्ट, अस्वर्ग्य असे हे तत्त्वज्ञान