पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
वैयक्तिक व सामाजिक

असंघटित नेभळा, दुबळा झाला आणि परकी आक्रमणाला शतकानुशतक बळी पडत राहिला तर त्यात नवल काय ?
 समाजातल्या घडामोडींवर जागरूकपणे नजर ठेवणारा, समाजावर कोसळणाऱ्या आपत्तींचा विचार करणारा, समाजरचनेची तत्त्वे फलदायी होत आहेत की त्यांना विपरीत फले येत आहेत याचा सतत अभ्यास करणारा, समाजाचा अपकर्ष होत असेल तर त्याची कारणे शोधून काढून समाजाला नवा धर्म सांगणारा, असा एक तत्त्ववेत्त्यांचा, धर्मप्रवक्त्यांचा, ग्रंथकारांचा, स्मृतिकारांचा वर्ग समाजात असावा लागतो. दुर्दैवाने हा वर्ग भारतातून नष्ट झाला होता. जे धर्मवेत्ते होते ते ऐहिक प्रपंचाविषयी उदासीन होते आणि तसे सर्वांनी व्हावे, असा उपदेश करीत होते. आठव्या शतकापर्यंत आपल्या समाजात नव्या नव्या स्मृतींची रचना होत होती आणि पुढे ती बंद पडली हे त्याचेच लक्षण होय. देवलस्मृतीची रचना इ. स. ७३२ च्या सुमारास झाली. महंमद कासीमाने हजारो हिंदूंची कत्तल केली आणि हजारो बाटविले. या आपत्तींतून समाजाला सोडविण्यासाठीच या स्मृतीची रचना झाली होती हे तिच्या प्रस्तावनेवरून स्पष्ट दिसते. ऋषींनी देवलमुनींना, म्लेंच्छांनी धर्मभ्रष्ट केलेल्या ब्राह्मण- क्षत्रियादि चातुर्वर्णीयांना शुद्ध कसे करून घ्यावे याबद्दल प्रश्न विचारला, असा देवलस्मृतीच्या प्रस्तावनेत उल्लेख आहे आणि प्रत्यक्ष स्मृतीमध्ये निरनिराळ्या लोकांसाठी अनेक प्रकारची प्रायश्चित्ते सांगितली आहेत. ही जागरूकता पुढे नष्ट झाली. धर्मवेत्ता ग्रंथकार हा समाजाचा कर्णधार आहे. तोच नष्ट झाल्यामुळे ही समाजनौका महासागरात वाटेल त्या दिशेला लोटली जाऊ लागली आणि दर वेळी खडकावर आपटून भग्न होऊ लागली. समाजाच्या ऐहिक हिताविषयीचे औदासीन्य हेच त्याच्या बुडाशी आहे. पुढल्या धर्ममार्तंडांनी स्वतः समाजचिंतन तर केले नाहीच, पण मागल्या धर्मवेत्त्यांनी समाजहिताची जी तत्त्वें सांगितली होती ती कलिवर्ज्य- प्रकरण निर्माण करून नष्ट करून टाकली. पतितशुद्धी हे त्यांपैकी एक आहे. शिवछत्रपतींनी पतितांच्या शुद्धीचे देवलप्रणीत तत्त्व पुन्हा अंगिकारले. यावरून समाजधुरीणाला अवश्य जागरूकता त्यांच्या ठायी कशी होती ते दिसून येईल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्या महापुरुषाने रूढ तत्त्वज्ञान उलथून टाकून नवधर्मतत्त्व प्रस्थापिले हेच त्याचे महान् क्रांतिकार्य होय. पण त्या कार्याचे