पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

झाला नाही. आणि यामुळे हिंदुधर्मामध्ये व्रते-वैकल्ये, सोवळे-ओवळे, टिळे- टोपी, तिथिवार नक्षत्रांचे विधिनिषेध, प्रायश्चित्ते यांनाच प्राधान्य मिळून त्याला अत्यंत हीन व अमंगळ रूप प्राप्त झाले. त्याचे गमक हेच की, या धर्माने राष्ट्रीय प्रपंचाची, समाजाच्या उत्कर्षापकर्षाची, त्याच्या योगक्षेमाची, त्याच्या रक्षणाची, पारतंत्र्यस्वातंत्र्याची या काळात पूर्वीसारखी कधीच दखल घेतली नाही. हरिहर पाठमोरे झाले, ऋषी निघून गेले, असे त्या वेळी लोक म्हणत होते. खरा अर्थ असा की लोक धर्माला पाठमोरे झाले होते. आणि म्हणूनच देवहि पाठमोरे झाले; लोक गुलाम झाले म्हणून त्यांचे देवहि गुलाम झाले. सोमनाथ, नगरकोट, मथुरा, कनोज येथील देवांचे उपासक नतद्रष्ट, दळभद्रे, भेकड, धर्महीन झाले म्हणून तेथील देवांना मृत्यु आला. लोक मात्र देवांना मृत्यु आला म्हणून आपला ऱ्हास झाला असा समज करून घेऊन, दळे होऊन, दैववादी होऊन स्वस्थ बसले होते. आपण देवांचे व धर्माचे रक्षण केले पाहिजे, म्हणजे धर्म आपले रक्षण करितो,' 'धर्मो रक्षति रक्षितः।' या महावाक्याचा त्यांना विसर पडला. 'धर्म वृद्धिंगत करण्यासाठी प्राण दौलत गेली तरी जावो, प्रयत्न करावा' हा विचार महाराजांच्या मनात ज्या दिवशी आला त्या दिवशी भारतात धर्मक्रांतीची आणि पर्यायाने राज्यक्रांतीची बीजे रोवली गेली.
 शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना, धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्व प्रकारची क्रांती केली, म्हणूनच त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मराठ्यांना पुढे मोगली सत्तेची पाळेमुळे भारतातून खणून टाकण्यात यश आले, हा या निबंधाचा प्रतिपाद्य विषय आहे. शिवछत्रपतींनी ही जी क्रांती घडविली ती कृतींनी घडविली, ग्रंथाने, तत्त्वज्ञानाने नव्हे. त्यांच्यामागे समर्थ रामदासांच्यासारखा एकटा एक ग्रंथकार उभा होता. पण त्यांचीही परंपरा पुढे चालली नाही. त्यांच्याबरोवर ती समाप्त झाली. छत्रपतींच्या प्रत्येक कृतीचे रहस्य जाणून तीत समाजाच्या सर्वांगीण क्रांतीची बीजे कशी आहेत, ते स्पष्ट करून क्रांतीचे तत्त्वज्ञान सांगणारे अनेक ग्रंथकार त्या वेळी होणे अवश्य होते. पण तसे झाले नाहीत हे या देशाचे दुर्दैव होय. युरोपात याच काळात असे ग्रंथकार झाले, शेकड्यांनी झाले म्हणून तेथला समाज प्रगत झाला, समर्थ झाला. धर्म आणि भौतिक विद्या या दोन्हींची जोपासना करून जग जिंकण्या-