पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/141

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२६)

रविवाने काढिलेलें महालक्ष्मीचे चित्र आहे अशी कल्पना करूं. हे चित्र पाहतांच आपले नेत्रांस आल्हाद होतो, व ते पुन्हा पुन्हा बारकाईने पहावे असे आपणांस वाटते व आपण तसें करितोहि. जसजसे जास्त निरीक्षण करावें तसतशी त्या चित्रांतील खुबी अधिकाधिक समजू लागते, व त्यामुळे मनास अधिकाधिक आल्हाद वाढू लागतो; चित्राचे निरनिराळे अवयव, त्याचे लांबी-रुंदीचे प्रमाण, त्यांतील रंगांची छटा, एखादे अवयवाचे ठिकाणी दिसणारे मृदुलत्व इत्यादि गोष्टींचे समतोलपणामुळे हा आल्हाद उत्पन्न होतो. नंतर त्यापासून सुखजनक भावना उत्पन्न होतात. रहिमतखासारख्या एखाद्या गवयाचे गाणे ऐकतांना आपले मनास खरोखरच एक प्रकारचा आनंद होतो. आता हा आनंद का होतो याचा जर आपण थोडासा विचार केला तर आपणांस असे समजून येईल की, हा आनंद गाण्यांतील अर्थबोधामुळे होत नाही; तर गवयाचा गोड आवाज, त्यांत वेळोवेळी येणारा कंप, तालसुरांत असलेला मेळ वगैरे सर्व गोष्टींचे एकीकरण झाल्यामुळे होतो; अशा स्थितीत मनावर उमटणारा ठसा खोल व स्पष्ट असतो. असो. या दोन उदाहरणांवरून सौंदर्यबोधोत्पादित भावनांचे सामान्य-स्वरूप समजले असेलच. सौंदर्य या शब्दाचा अर्थ माधुर्य, रमणीयता, चित्ताकर्षकता असा काहीतरी घ्यावयाचा. रहिमतखासारख्या गवयाचे गाणे ऐकतांच, किंवा राजा रविवर्म्यासारख्या चिताऱ्याने काढिलेले चित्र पाहतांच कोणाहि मनुष्यास क्षणभर आल्हाद होतो ही गोष्ट खरी, तरी पण एखाद्या मर्मज्ञास व सुशिक्षितास जसा आल्हाद होईल तसा इतरांस होणार नाही. यावरून बौद्धिक विकासाचा व या भावनांचा किती निकट संबंध आहे हे ध्यानात येईल. आपण नानाप्रकारची झाडे पहातों, फुले पहातों, फळे पहातों व ही पाहिल्याने आपणांस थोडे बरेंहि वाटते, परंतु वनस्पति-शास्त्रज्ञास किंवा एखाद्या कवीस या वस्तु अवलोकन केल्याने जसा एक विशेष प्रकारचा आनंद होतो, तसा आपणांस होत नाहीं; याचे कारण बुद्धीस मिळालेलें