पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/148

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३३)

स्वभावतःच अगोदर भित्री व नम्र असतात. वडील माणसांच्या आज्ञेचे उल्लंघन केले म्हणजे काय काय परिणाम होतात याचा त्यांना अनुभव आला म्हणजे तर ती अधिक नम्र बनतात, व म्हणूनच दुष्कृत्यांपासून अगर खोडसाळ कृत्यांपासून ती परावृत्त होतात. प्रीति, आदर, विश्वास, रूढीविषयी अभिमान या भावना जसजशा विकास पावतात, तसतसे शिस्तीचे नियम व वडिलांच्या आज्ञा कमी कमी त्रासदायक वाटू लागतात. तथापि नैतिक नियमांची खरी किंमत काय असते हे मुलांना समजत नसते. अर्थात् त्या नियमांबद्दल आदर अगर अभिमान मुलांना मुळीच वाटत नाही. जसजसा बुद्धीचा विकास होत जातो व जगाचा अनुभव अधिक अधिक येत जातो तसतशी नैतिक तत्त्वांची खरी किंमत कळू लागते. जे नियम आरंभी फार जाचक वाटतात तेच पुढे बरे वाटू लागतात, त्यांतील मर्म समजू लागते व कोणीहि जरी ते नियम मोडले तरी मुलांना राग येतो. सदाचरण सर्व माणसांना प्रिय असते ही गोष्ट मुलांच्या नजरेस येऊ लागली की मुले आपखुशीनें आपलें आचरण शुद्ध ठेवू लागतात. नैतिक भावनांचा सामाजिक भावनांशी. अगदी निकट संबंध आहे. सदाचरण म्हणून आपण ज्यास म्हणतो त्यांत नेहमी दुसऱ्याचे सुखदुःखाचा व हिताहिताचा संबंध येतो. सामाजिक भावनांचा विकास होऊ लागला की त्याबरोबर नैतिक भावनांचा विकास होऊ लागतो. विशेषेकरून सहानुभूतीची नैतिक भावनांचे विकासास बरीच मदत होते. मुलांची शिक्षकावर जर प्रीति असेल, जर काही त्यांचे मनांत आपले गुरूविषयी सहानुभूति वास करीत असेल, तर शिक्षकास खूश करण्याकरितां का होईना, मुले सदाचरण ठेवितील, व संवयीने हेच सदाचरण त्यांना आवडू लागेल, आणि सदाचरणरत जे लोक असतील तेहि त्यांना प्रिय होऊ लागतील, व त्यांना सुसंगति लागून सुकृतींचे वळणहि लागेल. नैतिक भावना नेहमी त्यांच्या मनांत जागृत राहतील व या भावनांचे कृतींवर व कृतींचं भावनांवर कार्य होऊन दोहोंची पूर्ण वाढ १२