पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/68

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५५)

योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. पुनरावृत्तीचे महत्त्व किती आहे, हे वर सांगितले आहेच. पुनरावृत्ति कंटाळवाणी वाटण्याचा फार संभव असतो, सबब पुनरावृत्ति करितांन सुद्धा निरनिराळ्या परंतु एकाच अर्थाच्या दुसऱ्या शब्दांचा उपयोग करावा. जेथे एखाद्या गोष्टींचा बोध एकापेक्षा अधिक इंद्रियद्वारे करणे शक्य असेल तेथे तसे करावें. वर कल्पनासाहचर्य या तत्त्वाचे प्रतिपादन केलेंच आहे. या तत्त्वाचाहि योग्य उपयोग करावा. पूर्वी मुलांना जे काही शिकविले असेल त्याशी जे नवीन शिकवावय चे असेल त्याची सांगड घालून द्यावी; व ज्या कल्पनांची सांगड घालून द्यावयाची त्यांतच एक प्रकारचा चित्ताकर्षकपणा असावा. मुलांस ज्या गोष्टी अगर कल्पना चांगल्या परिचित असतील त्यांमधील व ज्या नव्या गोष्टींची अगर कल्पनांची ओळख करून द्यावयाची असेल त्यांमधील साम्य व भेदभाव नीट दाखवावा.
 (२) स्मरणः-- स्मरणशक्तीच्या विकासाचे दुसरे अंग आठवण हे होय. यासंबंधी या स्थळी फक्त एकच गोष्ट सांगावयाची आहे ती ही:-शिक्षकाने मुलांस में शिकविले असेल त्याचे मुलांकडून प्रश्न करून वरचेवर पुनरुच्चारण करून घेणे. एवढे केले म्हणजे जे ग्रहण केले असेल त्याची पुढे स्मृति सुलभ व त्वरित होते. स्मरणशक्तीचा विकास करण्याच्या कामी शाळात शिकविले जाणारे बरेचसे विषय उपयोगी पडतात ते येथे सांगितले पाहिजेत. इतिहास, भूगोल, भाषाविषय, उच्च प्रकारचे वाङ्मय, शास्त्रीय विषयांतील काही विशिष्ट अंगें, हे विषय यांपैकी होत.
 प्रथमारंभी स्मरणशक्तीस शिक्षण देतांना निरीक्षणशक्तीचें साहाय्य शिक्षकाने व आईबापांनी घ्यावे. अगदी लहानपणी ज्यावेळी मुलांस बोलतांसुद्धा येत नसते, त्यावेळी मुलांच्या नजरेसमोर निरनिराळे पदार्थ आणावे व यांची नांवें स्पष्ट व वरचेवर उच्चारावी; असे केल्याने पदार्थ व त्यांची नांवे यांमधील साहचर्य मुलांच्या मनात ठसते. प्राथमिक शाळांतूनहि स्मरण शक्तीची वाढ करण्याच्या कामी शिक्षकाने मुलांच्या निरीक्षणशक्तीचा उपयोग करावा. वस्तु-