पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोणत्याही भाषेतील विनोदाला तीन संदर्भबिंदू असतात. एक, ती भाषा ज्या संस्कृतीचे, सामाजिक संस्थांचे, वैचारिक दृष्टिकोणाचे, जीवनश्रद्धांचे, चालीरीतींचे, वैशिष्ट्यपूर्ण कलादृष्टीचे प्रतिनिधित्व करीत असेल अशी केंद्रशक्ती; दोन, ज्यामधून वैशिष्ट्यपूर्ण रचनाबंध प्रस्तुतिकरणाची पद्धती व ज्याद्वारे विनोदाचा हेतू वा उद्दिष्ट सूचित होते अशी साहित्यकृती. तीन, भाषेतील असे एखादे स्थान, एखादा शब्द वा वाक्प्रचार, की जो विनोदाच्या दृष्टीने केवल अत्यावश्यक होय, ज्यांमधून विनोदाचा स्फोट होतो किंवा ज्यात विनोद साठवला जातो. बऱ्याच वेळा अनेक वाक्यांतून सांगितल्यानंतरही जे वाचणाऱ्या - ऐकणाऱ्यापर्यंत पोचू शकत नाही ते कधीकधी एकेका शब्दापासून अगदी नेमकेपणाने व्यक्त होते. पु. ल. देशपांडे यांच्या 'द्राक्षसंस्कृती' व 'रुद्राक्ष संस्कृती' या सुप्रसिद्ध शब्दांचा या संदर्भात उदाहरणादाखल उल्लेख करण्याजोगा आहे. सोद्देश्य स्वरूपाची विनोदी लेखांची निर्मिती (श्रीपाद कृष्ण, राम गणेश गडकरी, पु. ल. देशपांडे), विनोदामागून विनोद करण्याच्या लेखनरीतीतून घडलेले स्वैर विनोदी लेख (प्र. के. अत्रे, शामराव ओक, अ. वा. वर्टी, बाळ गाडगीळ, वि. आ. बुवा, रमेश मंत्री, सुभाष भेण्डे इ.) वेगवेगळ्या मानसपुत्रांच्या/ व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून झालेले विनोदी लेखन (श्री. कृ. कोल्हटकर, बाळकराम, पु. ल. देशपांडे, रमेश मंत्री इ.) विविध वाङ्मयीन विडंबने (प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, बाळ गाडगीळ इ.) अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कमीअधिक गुणवत्तेच्या विनोदी वाङ्मयाची बरीच मोठी नोंद होऊ शकेल. मराठी कथेतील नि: संशय पहिले ठसठशीत विनोदरूप चिं. वि. जोशी यांच्या कथांतून प्रकटते. मध्यमवर्गीय जीवनवास्तवाचे सलग व प्रभावी दर्शन अत्यंत खेळकर पद्धतीने त्यांच्या कथांमधून घडते. रावसाहेब चिमणराव स्टेट गेस्ट, स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग, गुंड्याभाऊचे दुखणे, कालाय तस्मै नमः, सौजन्य सप्ताह, प्रामाणिकपणाविषयी आजीबाई, माझे दत्तक वडील यांसारख्या अनेक कथांची या संदर्भात उदाहरणे घेता येतील. कथेच्या स्वयंपूर्ण रूपात चिमणराव, गुंड्याभाऊ आणि त्यांच्या परिवारातील साऱ्या माणसांचे, त्यांच्या कौटुंबिक जीवनाचे, त्यांच्या ध्येयादर्गांचे, ते ज्या समाजाचे घटक होते, तेथील नीतिसंकेतांचे, अनेकपदरी मानवी संबंधांचे प्रगाढ भान चिं. वि. जोशी यांनी व्यक्त केले आहे. जीवनव्यवस्थेतील असमानतेचा निषेध करण्याचे कार्य ज्याप्रमाणे विनोदामार्फत होत असेत, त्याप्रमाणेच जीवनस्वीकाराचा, परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्याचा सामोपचाराचा मार्गही विनोदाद्वारे खुला होतो. शेकडो शंभरातील एका चिमणरावाच्या कथांमधून सर्व मानवी विसंगतींसह, मर्यादा- दोषांसह जगण्याची क्षमता देणारा विनोद अवतरला आहे. मानवी जीवनपद्धतीविषयी आणि वर्तनव्यवहाराविषयी उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांवर व तदनुषंगिक युक्तिवादांवर विनोदातून होणाऱ्या भाष्याचे अनेक अवतार आपल्याला या कथांत दृष्टीस पडतात. मर्यादायुक्त माणसांच्या जीवनाची वाटचाल सुखकर व्हावी अशी प्रबल आंतरिक इच्छा चिं. वि. जोशी यांच्या कथांतून ज्याप्रमाणे प्रकटते, त्याप्रमाणेच विकारबहुल व्यक्तिजीवन व समाजव्यवहार सभोवताली असताना निरोगी, संपन्न व सुखी समाजाचे स्वप्नही चिं. वि. जोशी यांच्या कथात्मक विनोदनिर्मितीमधून डोकावत असते. अत्र्यांनी जे विपुल विनोदी लेखन केले त्यातून त्यांच्या अफाट व्यक्तिमत्त्वाला साजेशी विनोदात्मकता व्यक्त होते. काही अपवाद वगळता अत्रे यांचे कोणतेही लेखन विनोदावाचून साकार होऊ शकत नाही, विनोद हा त्यांच्या एकंदर लेखनाचाच प्रकृतिधर्म आहे. त्यांचे अग्रलेख, त्यांच्या कथा, त्यांची नाटके यांमधून खळखळून हसवणाऱ्या विनोदाचा मुक्त संचार झाला आहे. गुत्त्यात नारद, ब्रँडीची बाटली, बाजारात तुरी, सार्वजनिक जीवन, पहिले कावळे संमेलन, गांधीवादी पाहुणा या त्यांच्या स्वतंत्र विनोदी कथा प्रसिद्ध आहेत. या सर्व कथा कथेचा प्रकृतिधर्म सांभाळणाऱ्या आहेत. वेधक आरंभ, कृतिप्रधान प्रसंग, पृथगात्म पात्रनिर्मिती, चित्रदर्शी मांडणी, प्रसंगनिष्ठ व शब्दनिष्ठ विनोदांतील सहजता व कलाटणीपूर्ण अंत अशा स्वरूपात अत्रे यांच्या कथा साकार होतात. शामराव ओक यांचा विनोद मुख्यत्वे मानवी वर्तनातील विसंगती टिपणारा परंतु सौम्य प्रकृतीचा आहे. त्यांच्या असंभव, दुग्धमंदिरातील प्रेमकथा, पुरुषपार्टी, आझाद मैदानावरची क्रिकेट मॅच, निवृत्तिनिवास, प्राध्यापकाचा मधुचंद्र या कथा सुरस व चमत्कारिक आहेत. काल्पनिक प्रसंग, अतिशयोक्त वर्णने, विडंबनाकडे वळणारा विनोद ही त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये म्हणता येतील. मराठीतील विनोदी कथा वेगळे वळण घेते ती द. मा. मिरासदार यांच्या कथांमधून. मिरासदारांचे लेखन हे मूलतः अस्सल कथारूप घेणारे लेखन आहे. मिरासदारांच्या कथांतून ग्रामजीवनात वावरणाऱ्या तेथील जीवनव्यवहाराशी शिल्पकार चरित्रकोश साहित्य खंड / एकशेएकोणतीस