पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठीचीच कास धरत राहिलो तर आपण मागे पडल्यावाचून राहाणार नाही, असा धोक्याचा इशारा दुसरीकडे! अर्थात ही परिस्थिती मराठी भाषकांपुरती मर्यादित नाही. जगभरातच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेबद्दल उलटसुलट मतप्रवाह आहेत. आपले आर्थिक व राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा मुख्यतः अमेरिकेसारख्या आणि अनुषंगाने इतर युरोपीय देशांचा हा कार्यक्रम आहे असे आरोप केले जात आहेत. यातही नेमके तथ्य किती ते सागंणे अवघड आहे. बरे तथ्य असले तरी आपण काय करणार? अशी प्रकारची एक परवशतेची भावना सर्वच माणसांमध्ये वाढते आहे. संपर्कमाध्यमांच्या भाषेचे त्यांद्वारे होणाऱ्या करमणुकीमागील वृत्तिप्रवृत्तींचे, वेगवेगळ्या वाहिन्यांद्वारा चालवल्या जाणाऱ्या मालिकांचे भाषेवर, साहित्यनिर्मितीवर व लोकांच्या मनःस्थितीवर होणारे जे आक्रमण आहे ते झपाट्याने वाढते आहे. या आक्रमणाचा निप्पात कसा करावा तेही पुरतेपणाने उमगत नाही. असे अनेकानेक पेच आहेत. जागतिकीकरणाचा एक दुष्परिणाम रंगनाथ पठारे यांनी सर्वांच्या निदर्शनास आणला आहे. ते म्हणतात, "जागतिकीकरणात माणसांसकट साऱ्या सजीव-निर्जीव वस्तूंचे सपाटीकरण होणार. तिथं बदलाला जागाच उरणार नाही. संकराची संधीच नाही. बदलायचं असेल, ते करणं त्यांना आवश्यक असेल तर ते बदलतील. बाकीच्यांनी तो विचार करायचा नाही. निसर्गाच्या व्यवस्थेतला हा आडमाप वा वारेमाप हस्तक्षेप दुनियेला सपाट करून टाकील. उभ्या-आडव्या कोणत्याही अक्षांच्या कल्पनांची गरजच राहणार नाही. दोन इलेक्ट्रॉन घेतले तर ते अगदी एकसारखे असतात. वेगळी ओळख न उरलेले असतात. तसंच माणसांचं. यातून दुनियेत फक्त काही माणसं साऱ्या इतरांवर ताबा मिळवणार. इतर जे आहेत ते सारे एकसारखे. वेगवेगळ्या माणसांनी वेगवगेळ्या प्रकारे विचार करून, विचारविनिमय करून, निके सत्त्व शोधून सत्याच्या निकट जायचे असते. त्यातूनच मानवी संस्कृतीचा विकास होतो असं आजवर आपण म्हणत आलो. अशा विकासात सहभागीहोण्याची संधीच दुनियेतल्या बव्हंशी माणसांकडून काढून घेतली जाईल." (पठारे, रंगनाथ, २००३, पृ. २६) जागतिकीकरणाची प्रक्रिया मूलतः आर्थिक असल्यामुळे तिचा परिणाम एका मर्यादित अर्थाने का होईना प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे साहित्यावर घडणार यात शंकाच नाही. जगातील कोणतीही साहित्यकृती मग ती कोणत्याही भाषेतली असो तिच्यातून जर अर्थलाभ घडणार असेल तर देशांच्या सीमा ओलांडून व्यावसायिक प्रकाशक एक विक्रीची वस्तू म्हणून तिचा अग्रक्रमाने विचार करू शकतात.

"वाङ्मयविश्वाला बाजारपेठेचे एक परिमाण असते तसेच निखळ वाङ्मयीन मूल्यांचेही परिमाण असते. या दुसऱ्या परिमाणाचे बाजारपेठेशी नेहमीच निकटचे नाते नसते.... खुल्या बाजारपेठेबरोबरच एक खुली मानसिकता निर्माण होईल या खुल्या मानसिकतेचा निखळ कलात्मक मूल्यांना जपणाऱ्या लेखनाला फायदा होईल... वाङ्मयाच्या सामाजिक परिमाणाविषयी बोलावयाचे तर मराठी वाङ्मयात सामाजिकदृष्ट्या विकेंद्रीकरणाची, अनेककेंद्रीयत्वाची प्रक्रिया सुरू झालीच आहे. ही प्रक्रिया जागतिकीकरणाच्या युगात अधिक वेग घेईल, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना अधिक मुक्तता, अधिक अवकाश व निवडस्वातंत्र्य उपलब्ध होईल. एकंदरीतच जागतिकीकरणाचे वाङ्मयीन परिणाम उपकारक होतील....वसाहतवादाच्या दीर्घ अनुभवामुळे भारतीय वाङ्मयांना जागतिक संदर्भात दुय्यम स्थान दीर्घकाळ अनुभवावे लागलेले आहे त्याहून आणखी वाईट परिस्थिती काय होणार?... मराठी पुस्तकांना पाश्चात्त्य बाजारपेठेत (अनुवादाद्वारे) चंचूप्रवेश करण्याची संधी उपलब्ध होईल.... मराठीबाहेरील निरीक्षक मराठी वाङ्मयावर जेव्हा दृष्टिक्षेप टाकतील तेव्हा त्यांना त्यांच्या दृष्टीने लक्षणीय वाटेल अशा लेखनाचीच ते नोंद घेतील. मराठी मध्यवर्ती संस्कृतीला जे लेखक महत्त्वाचे वाटतात ते बाहेरच्यांनाही वाटतीलच असे नाही.... परक्यांनी केलेली खुली, स्वतंत्रचिकित्सा व आंतरराष्ट्रीय तौलनिक मूल्यमापन यांना केवळ भारतीय वाङ्मयांना तोंड द्यावे लागेल असे नव्हे, तर पाश्चात्त्य वाङ्मयांनाही तीच परीक्षा पार पाडावी लागेल. सर्व वाङ्मयांचे मूल्यमापन ' मेरीट'वर होण्याची शक्यता वाढेल." असे विचार विलास सारंग यांनी मांडले आहेत. (सारंग, विलास, २००७, पृ. ५-६-७-८) जागतिकीकरणाच्या संदर्भात वरील विचारांपेक्षा अगदी वेगळे विचार भालचंद्र नेमाडे यांनी मांडले आहेत. "जागतिकीकरणाला थोपवून धरणारं देशी परंपरांसारखं दुसरं कोणतंही अमोघ शस्त्र नाही. तुमची परंपरा डोळसपणे चालू एकशेचौतीस / साहित्य खंड शिल्पकार चरित्रकोश