पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अ- औ

आपटे, नारायण हरी
साहित्य खंड
 

मार्ग चालतच गेले. 'कुंकू', 'गोपालकृष्ण', 'तुकाराम' आदी चित्रपटांसाठी गीत-लेखन केले. त्यांची गीते सुरेल, सजीव व सौंदर्यसंपन्न होती. म्हणूनच एक उत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना नावलौकिक मिळाला. प्रभात सोडल्यानंतर त्यांनी 'वहिनीच्या बांगड्या', 'शेवग्याच्या शेंगा', 'वावटळ' या चित्रपटांचे दिग्दर्शन स्वतंत्रपणे केले. 'वावटळ' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला. १९६६ नंतर ते या क्षेत्रातून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांची लेखणी अध्यात्म, भारतीय तत्त्वज्ञान, गूढविद्या या विषयांकडे वळली. त्यांच्या पद्यरचनेचे 'एकले बीज' (१९३८), 'बीजांकुर' (१९४०), 'चंदेरी लहरी' (१९४७), 'सुमन फळे' असे चार संग्रह प्रसिद्ध आहेत. प्रारंभीची त्यांची कविता जातिवृत्तातील, अनलंकृत होती. चित्रपट गीतलेखनानंतर तिचे स्वरूप पालटले. 'संत तुकाराम' चित्रपटातील 'आधी बीज एकले' हे त्यांचे गीत तुकारामांच्या अभंगाशी इतके मिळतेजुळते होते की अनेकांनी त्या गीताचा शोध तुकाराम गाथेत घेतला.
 त्यांचे गद्यलेखन बरेच आहे. प्रभात कंपनीत काम करीत असताना, त्यांनी कलेचे जे जग अनुभवले, तिथे ज्याचे- ज्याचे निरीक्षण केले, ज्या व्यक्तींच्या सहवासात ते आले; त्या सर्वांचे तटस्थ वृत्तीने, जाणिवेच्या पातळीवर रेखाटलेले 'प्रभातकाळ' (१९५०) हे विलक्षण हृद्य व चित्ररूप आत्मकथन आहे. आंतरिक जिव्हाळ्यामुळे ही कहाणी रसिक मनाची पकड घेते. अन्य लेखन परविद्येच्या साधन, संशोधन या विषयाशी निगडित आहे. प्रभात कंपनीसंबंधी त्यांनी नोंदविलेल्या तपशिलाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.

- शैलजा पुरोहित

आपटे, नारायण हरी
कादंबरीकार, कथाकार
११ जुलै १८८९ - १५ नोव्हेंबर १९७१

 'सामान्य वाचकाचे सामान्य लेखक ही बिरुदावली मिरवण्यात धन्यता मानणारे वाचकप्रिय' आपटे यांचा जन्म समडोली, जि. सातारा येथे झाला. प्राथमिक शिक्षणही याच गावी झाले. हायस्कूल शिक्षणाकरता साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. या काळातच हरिभाऊ आपटेंच्या कादंबऱ्यांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला. ध्येयवादाचे बीज मनात रुजू लागले. तशातच शिवरामपंत परांजपे ह्यांच्या 'काळ' या पत्रातील जहाल विचारसरणीच्या परिणामाने स्वातंत्र्य चळवळीकडे त्यांचे मन ओढले गेले. या मनोवस्थेमध्येच त्यांनी पायी देशाटन करण्याचा निर्णय घेतला आणि १९०४ साली घर सोडले. दौलताबाद, वेरूळ, खानदेश, उत्तर प्रदेश, बंगाल अशी हजारो मैलांची पदयात्रा घडल्यामुळे परिस्थितीचे त्यांना बारकाईने दर्शन घडले. अनेक थोर व्यक्तींचे विचार ऐकण्याची संधी प्राप्त झाली. हिंदी व बंगाली या भाषांचा परिचय झाला. प्रवासाच्या शेवटच्या टप्यात त्यांचे जयपूर येथे बराच काळ वास्तव्य घडले. या वास्तव्यात त्यांनी उर्दू आणि संस्कृत ह्या भाषांची ओळख करून घेतली व राजपुतांचा इतिहासही अभ्यासला. त्यातून त्यांचा ध्येयवादी दृष्टिकोन बळावला. त्याचीच परिणती म्हणून, १८व्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाचे चित्र रेखाटणारी 'अजिंक्यतारा' ही कादंबरी त्यांनी १९०७ साली जयपूरमध्येच लिहून १९०९ मध्ये प्रसिद्ध केली. १९०४ ते १९१२ असा आठ वर्षांचा त्यांचा काळ प्रवासातच गेला. या कालावधीत बराच काळ त्यांना एका ख्रिस्ती कुटुंबात आश्रय लाभला होता. तेथे मिळालेल्या जिव्हाळ्यामुळे त्यांची दृष्टी व्यापक झाली. १९१२ मध्ये ते आपल्या गावी परतले. पुढे १९१७ साली साताऱ्याजवळच्या कोरेगावात ते स्थायिक झाले. 'किर्लोस्कर' मासिकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी


२२
शिल्पकार चरित्रकोश